भारत-पाकिस्तान फाळणीच्या झळा ज्यांनी सोसल्या त्यांना आजही या वेदनांनी असह्य होतं. भारताच्या इतिहासातील प्रचंड नरसंहार झाला. दोन देशांमध्ये धावणाऱ्या अनेक रेल्वे रक्ताने न्हाऊन निघाल्या होत्या. मृतदेहांचे ढिग बाहेर काढावे लागत होते. अनेक कुटुंब कायमची मिटली, तर काहींना कुटुंबाशिवाय आयुष्यभर या वेदना घेऊन जगावं लागलं. फाळणीच्या झळा सोसलेल्यांपैकी एक होते मिल्खा सिंग… ज्यांचं नाव भारत-पाकिस्तानच्या इतिहासात फ्लाईंग शिख मिल्खा सिंग असं नोंदवलं गेलं. मिल्खा सिंग यांचा फ्लाईंग शिख असा बहुमान होण्याचा किस्साही तितकाच चित्तथरारक आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे.

भारत-पाकिस्तान ही दोन राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्यातील संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्यासाठी एक प्रयत्न केला गेला. १९६० साली भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होणारे सामने वरकरणी मैत्रीपूर्ण वाटत असले, तरी ते प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना या स्पर्धेत खेळण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिल्खा भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू होते. परंतु त्यांची या स्पर्धेत भाग घेण्याची मूळीच इच्छा नव्हती.

आणखी वाचा- फाळणीच्या जखमा ते एका सेकंदाने हुकलेलं पदक… असा आहे मिल्खा सिंग यांचा खडतर संघर्ष

स्पर्धेत भाग न घेण्यामागे सर्वात मोठं कारण होतं पाकिस्तान पाऊल न ठेवण्याचा मनोमन केलेला निश्चय… कारण स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांची फाळणी झाली. फाळणीचं बोट धरूनच प्रचंड दंगली उसळल्या, ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. या उसळलेल्या दंगलीतच पाकिस्तानातील मुलतानजवळील लायलूर गावात मिल्खा सिंग यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारात १२ भावंडापैकी मिल्खा सिंग यांच्यासह चौघेच वाचले. त्यावेळी रात्रभर पळून त्यांनी स्वत:चा जीव वाचवला होता. त्यानंतर त्यांनी महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे दिल्ली गाठली. पण, ज्या ठिकाणी आपल्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली, त्या भूमीवर पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही, अशी शपथच त्यांनी घेतली होती.

या एका कारणामुळे मिल्खा सिंग यांनी भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला होता. पण, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच होते. अखेर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच मिल्खा सिंग यांना विनंती केली. नेहरूंच्या आग्रहाखातर आणि केवळ देशावरील प्रेमापोटी त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून मिल्खा यांनी अब्दुल खालिदला हरवले. त्यावेळी पाकिस्तानात भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी दिली.

Story img Loader