स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीदरम्यान उसळलेल्या दंगलीत मुलतानजवळील लायलूर गावात आई-वडिलांची झालेली हत्या.. वडिलांचे कानावर पडलेले ‘भाग मिल्खा भाग’ हे शब्द.. रात्रभर पळत पळत स्वत:ची केलेली सुटका.. समोर मृत्यू दिसत असताना महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे गाठलेली दिल्ली.. खडतर परिस्थितीत घालवलेले दिवस.. सेनादलात सामील झाल्यानंतर घेतलेले परिश्रम.. राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये केलेली देदीप्यमान कारकीर्द.. पाकिस्तानात मिळवलेली ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी.. रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाने एका सेकंदाने दिलेली हुलकावणी.. महान धावपटू मिल्खा सिंग यांचा हा खडतर संघर्ष.
प्रा. संजय दुधाणे यांच्या ‘फ्लाईंग शिख मिल्खासिंग’ या पुस्तकात मिल्खा सिंग यांची संघर्षगाथा मांडण्यात आली आहे. ज्या देशात आपल्या कुटुंबाची हत्या करण्यात आली, त्याच पाकिस्तानात १९६०मध्ये भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जाण्याची इच्छा नसतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाखातर मिल्खाला जावे लागले. पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खाला पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी दिली, हा प्रसंग अतिशय सुरेख पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
रोम ऑलिम्पिकमध्ये सर्वाच्या नजरा मिल्खा सिंगवर असताना पहिल्या २०० मीटपर्यंत आघाडी घेणाऱ्या मिल्खाने मागे वळून पाहिले आणि कांस्यपदक एका सेकंदाने हुकले, हा थरार या पुस्तकात वाचताना अंगावर शहारे उमटतात. मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्याआधीच दुधाणे यांनी हे पुस्तक बाजारात आणले आहे. पण त्यासाठी मिल्खा सिंग यांचे चरित्र घाईघाईने रेखाटताना त्यांच्या जीवनातील खडतर कहाण्या या पुस्तकात मांडणे अपेक्षित होते. एकूणच, युवा अ‍ॅथलीट्ससाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे.
पुस्तक : ‘फ्लाईंग शीख मिल्खासिंग’
लेखक : प्रा. संजय दुधाणे
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत : ५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा