ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर रविवारी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत असून, या निमित्ताने नाशिककरांकडून त्यांचा यथोचित नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या क्रीडा संघटना आणि संस्था ‘मिळून सारे..’ या छत्राखाली एकत्रित आले असून, रविवारी ‘अमृतमहोत्सवी मानाचे पान’ या शिर्षकाखाली होणाऱ्या कार्यक्रमात करमरकर यांना एक लाख रुपयांची थली प्रदान करणार आहेत. याशिवाय त्यांची क्रीडा पुस्तकांची तुलाही करण्यात येणार आहे.
‘मिळून सारे..’चे संयोजक मंदार देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, ‘‘वि. वि. यांचा जन्म नाशिकचा त्यामुळे आम्ही येथील संघटनांनी एकत्रित येऊन त्यांचा नागरी सत्कार करण्याचे ठरवले आहे. सायंकाळी ५.३० वाजता परशुराम सायखेडकर नाटय़मंदिर, टिळक पथ, नाशिक येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला बुद्धिबळातील ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, कबड्डीतील अर्जुनवीर शांताराम जाधव, नाशिकचे महापौर यतीन वाघ आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी करमरकर यांची क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत आणि क्रीडा संघटक भास्कर सावंत प्रकट मुलाखत घेणार आहेत.’’
करमरकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मंगळवारी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.