परदेशामध्ये गोलंदाज निवडताना भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा. परदेशामध्ये गोलंदाज निवडताना त्यांच्यामध्ये अधिक पर्याय असायला हवेत. परदेशातील संघ निवडताना वेगवान आणि त्याबरोबरच फिरकी गोलंदाजांचा योग्य समन्वय असायला हवा, असे मत भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने व्यक्त केले आहे.
‘‘आपल्याकडे चांगले गुणवान गोलंदाज आहे, पण त्यांचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. या गोलंदाजांमध्ये कसोटी सामन्यात २० बळी मिळवण्याची क्षमता असली तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवे, ’’ असे कुंबळे म्हणाला.
परदेशातील गोलंदाजांच्या निवडीबद्दल कुंबळे म्हणाला की, ‘‘जेव्हा आपण परदेशामध्ये जातो तेव्हा प्रत्येक वेळेला आपण तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूला संधी देतो. याशिवाय दुसरे समीकरण आपण वापरताना दिसत नाही. एखाद्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू आपल्याला जास्त विकेट्स मिळवून देऊ शकतात, पण आपण कधीच आपला दृष्टिकोन बदलल्याचे दिसत नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू मालिकेत सर्वात यशस्वी ठरला होता, पण भारताच्या फिरकीपटूंना आपली छाप पाडता आली नाही. या मालिकेत भारताच्या गोलंदाजीमध्ये शिस्त पाहायला मिळाली नाही आणि त्याचाच परिणाम मालिकेच्या निर्णयावर झाला.’’
भारताने गोलंदाजांमध्ये बदल करू नयेत
सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय फलंदाजांवर चहूबाजूने टीका होत असतानाच न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांनी या गोलंदाजांमध्ये भारताने बदल करू नयेत, ते अनुभवाने शिकतील, असे मत व्यक्त केले आहे.
‘‘माझ्या मते भारताने त्यांच्या गोलंदाजांमध्ये मोठे बदल करू नयेत. कारण या गोलंदाजांमध्ये चांगली गुणवत्ता आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नसली तरी ते अनुभवातून शिकतील,’’ असे फ्लेमिंग यांनी सांगितले. भारताच्या गोलंदाजांबद्दल ते म्हणाले की, ‘‘ इशांत शर्माकडे चांगला अनुभव आहे, पण त्याने कामगिरीत सातत्य दाखवायला हवे. उमेश यादव आणि वरुण आरोन यांच्या गोलंदाजीमध्ये चांगला वेग आहे, त्याचबरोबर त्यांना चेंडू स्विंगही करता येतो. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोघांकडे चांगली गुणवत्ता आहे, त्यामुळे या घडीला भारताने गोलंदाजांमध्ये बदल करू नये, त्यांना आणखी संधी द्यायला हवी.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा