लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती आणि पाच वेळा विश्वविजेतेपदाचा किताब पटकावणारी एम. सी. मेरी कोम हिच्या इम्फालमधील बॉक्सिंग अकादमीतील बांधकामासाठी क्रीडा मंत्रालयाकडून अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
‘‘राष्ट्रीय क्रीडा विकास निधीच्या कार्यकारी समितीने मेरी कोमच्या विभागीय बॉक्सिंग अकादमीमधील आऊटडोअर बॉक्सिंग सभागृह बांधण्याकरिता अतिरिक्त आर्थिक साहाय्य करण्याला तत्वत: मंजूरी दिली आहे. मेरी कोमच्या बॉक्सिंग अकादमीकडून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर या शिफारशीवर कार्यवाही करण्यात येईल,’’ असे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कार्यकारी समितीने या अकादमीचा आराखडा तयार केला असून भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) विभागीय केंद्रामधील अधिकारी या अकादमीच्या बांधकामावर लक्ष ठेवून असतात. ‘‘राष्ट्रीय क्रीडा विकास निधीच्या कार्यकारी समितीने अकादमीतील जिम्नॅशियम सभागृह आणि जिमचे साहित्य बसवण्यासाठी ३०६.४४ लाख रुपयांचा निधी मे महिन्यात मंजूर केला होता. अकादमीसाठी देण्यात आलेली जमीन तसेच अकादमीच्या व्यवस्थापनातील मेरी कोमचा सहभाग याबाबतची माहिती सादर करण्यात आल्यानंतरच हा निधी मंजूर करण्यात आला होता. अकादमीने याबाबतची सर्व कागदपत्रे सादर केली असून लवकरच निधी मंजूर केला जाईल,’’ असेही पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader