हाताशी आलेली चांगली संधी गमावल्यामुळे मुंबईचा पाय खोलात असल्याचे चित्र जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिसत आहे. जम्मू आणि काश्मीरचा संघ पहिल्या डावात १८ धावांची नाममात्र आघाडी घेऊन तंबूत परतला, तेव्हा मुंबईला वरचढ होण्याची संधी होती; पण सवंग फलंदाजीने त्यांचा घात केला. दिवसअखेर मुंबईने चार फलंदाज गमावले असून अनुभवी फलंदाज वासिम जाफरला दुखापत झाली असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. दुसऱ्या डावात सलामीवीर शुभम खजुरियाच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर जम्मू आणि काश्मीर संघाला पहिल्या डावात २५४ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दिवसअखेर ४ बाद ६६ अशी अवस्था असून त्यांच्याकडे ४८ धावांची आघाडी आहे.
पहिल्या सत्रात दमदार फलंदाजी करत शुभमने विशाल दाभोळकरला षटकार ठोकत शतकाला गवसणी घातली. उपहाराला तीन मिनिटे शिल्लक असताना त्याचा वासिमने अभिषेक नायरच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल सोडत त्याला जीवदान दिले; पण उपहारानंतर चौथ्याच षटकात तो बाद झाला. शुभमने १२ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १०७ धावांची खेळी साकारली. शुभम धावबाद झाल्यावर जम्मू आणि काश्मीरच्या फलंदाजांची रांग लागली. दुसऱ्या सत्रात फक्त ५७ धावांच्या मोबदल्यात त्यांनी आठ विकेट्स गमावल्या.
तिसऱ्या सत्रात मुंबईच्या दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात झाली नाही. सलामीवीर ब्रविश शेट्टीला (१७) गमावल्यानंतर ३२ धावांमध्ये मुंबईचे आणखीन तीन फलंदाज तंबूत परतल्याने त्यांची बिकट अवस्था झाली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : २३६  (दुसरा डाव) : २४ षटकांत ४ बाद ६६ (केव्हिन अल्मेडा २७; उमर नझीर २/८).
जम्मू आणि काश्मीर (पहिला डाव) : ८७.३ षटकांत सर्व बाद २५४ (शुभम खजुरिया १०७, इयान चौहान ७०; विशाल दाभोळकर ३/३०).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा