पारंपरिक कसोटी क्रिकेटचा दर्जा छोटय़ा संघांनाही मिळवता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढाकार घेतल्याचे त्यांच्या कार्यकारिणीच्या समितीच्या बैठकीमध्ये दिसून आले. यासाठी आयसीसीने ‘टेस्ट चॅलेंज’ स्पर्धेचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. प्रत्येक चार वर्षांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यामध्ये आयसीसीच्या कसोटी क्रमावारीतील अखेरचा संघ आणि ‘इंटर-कॉन्टिनेंटल’ चषक स्पर्धेतील विजेता यांच्यामध्ये चार सामने होतील. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी ठरेल त्याला कसोटी दर्जा मिळेल आणि क्रिकेट विश्वातील मोठय़ा संघांशी कसोटी सामने खेळण्याची त्यांना संधी मिळणार आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे छोटय़ा संघांनाही कसोटीचे दार खुले करण्यात आले आहे.
कसोटी क्रिकेटचा दर्जा दहा मुख्य देशांना आहे, या दहा देशांबरोबर त्याचबरोबर सहयोगी आणि संलग्न अशी क्रिकेट खेळणाऱ्या देशांची वर्गवारी तीन गटांमध्ये होते. मर्यादित षटकांचे सामने खेळण्याची संधी सहयोगी आणि संलग्न देशांना मिळते. पण क्रिकेटचा पारंपरिक अवतार असलेल्या कसोटी क्रिकेटपासून हे देश दूरच राहतात. क्रिकेट वर्तुळात या छोटय़ा देशांना कसोटी खेळण्याचा हक्क मिळावा यासाठी आयसीसीने यंदाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पुढाकार घेतला आहे.
आयसीसीच्या दुबई येथे झालेल्या विशेष कार्यकारिणी समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, दर चार वर्षांनी जागतिक क्रमवारीतील सर्वात शेवटचा कसोटी संघ आणि आयसीसीच्या ‘इंटर-कॉन्टिनेंटल’ चषक विजेत्या संघादरम्यान निर्णायक मुकाबला होणार आहे. याचाच अर्थ बांगलादेश किंवा झिम्बाब्वे संघाला संयुक्त अरब अमिराती, आर्यलड किंवा नेदरलॅण्ड्सशी दोन हात करावे लागणार आहेत. आयसीसीच्या कार्यकारिणी समितीने या स्पर्धेला मंजुरी दिल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आयसीसी ‘टेस्ट चॅलेंज’ स्पर्धेमुळे गुणवत्ता असलेल्या परंतु प्रस्थापित रचनेमुळे कसोटी खेळू न शकणाऱ्या देशांना कसोटी खेळण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे आयसीसी ‘इंटर-कॉन्टिनेंटल’ चषकाचे महत्त्वही वाढले आहे. या चषकाच्या जेतेपदासह चॅलेंज स्पर्धा जिंकल्यास त्या देशाला कसोटी खेळण्याची अनोखी संधी प्राप्त होणार आहे. आयसीसी टेस्ट चॅलेंजनुसार, ३१ डिसेंबर २०१७ला  जागतिक क्रमवारीतील दहावा म्हणजेच अंतिम संघ आणि आयसीसी ‘इंटर-कॉन्टिनेंटल’ चषकाचा विजेता संघ यांच्यात चार कसोटी सामने होणार आहेत.
यापैकी दोन घरच्या मैदानावर, तर अन्य दोन प्रतिस्पर्धी देशात होणार आहेत. प्रस्तावित कार्यक्रमानुसार पहिली इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धा २०१८ मध्ये होणार आहे. पुढील आठ वर्षांत दोन आयसीसी इंटर-कॉन्टिनेंटल चषक स्पर्धा होणार आहेत. यापैकी पहिली २०१५ ते २०१७, तर दुसरी २०१९ ते २०२१ या कालावधीत होणार आहे. दुसरी आयसीसी ‘टेस्ट चॅलेंज’ प्रस्तावित कार्यक्रमानुसार २०२२ मध्ये होणार आहे.