Misbah ul Haq said that if the Pakistan team did not go to India it would be unfair to the fans: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी १० संघांचा सहभाग असणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या विश्वचषक स्पर्धेतील सहभागाची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या विश्वचषकाला उपस्थित राहण्यास नकार देत हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्याची अट घातली आहे. यावर आता पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकने प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार असलेल्या मिसबाहचा हवाला देत एनडीटीव्हीने लिहिले की, ‘जेव्हा इतर खेळांमध्ये दोन्ही देशांमध्ये संपर्क होऊ शकतो, तेव्हा क्रिकेटमध्ये का नाही? क्रिकेटला राजकीय संबंध का जोडले जातात? ते त्यांच्या संघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहू शकत नाहीत. हा लोकांवर अन्याय आहे. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटला भरपूर फॉलो करणाऱ्या चाहत्यांवर हा अन्याय आहे.
पाकिस्तान संघात भारतात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे –
मिसबाह-उल-हकने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानने भारतातही विश्वचषक खेळला पाहिजे. मी भारतात खूप क्रिकेट खेळलो आहे. आम्ही तेथील दबाव आणि गर्दीचा आनंद घेतला आहे. कारण त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळते. भारतीय परिस्थिती आम्हाला अनुकूल आहे, आमच्या संघात भारतीय परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.’
खेळाडूंनी बाहेरील गोष्टींकडे लक्ष देऊ नये –
मिसबाह-उल-हकने संघातील खेळाडूंना सल्ला दिला. तो म्हणाला, ‘खेळाडूंनी बाहेरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वचषक भारतात होत आहे. त्यामुळे तुम्ही ठिकाणानुसार तुमचे सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली पाहिजे, जेणेकरून तुम्ही विरोधी संघाला पराभूत करू शकाल.’
हेही वाचा – MS Dhoni: माही योगी बाबूसह केक कापताना दिसला मस्तीच्या मूडमध्ये, VIDEO होतोय व्हायरल
पाकिस्तानचा संघ पहिला सामना नेदरलँडशी खेळणार आहे –
आयसीसीने जाहीर केलेल्या विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार, पाकिस्तान संघ ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागाची स्थिती लवकरच स्पष्ट होईल, असे मानले जात आहे.