मला टीम इंडियाचा कोच व्हायची इच्छा होती, मात्र बीसीसीआयमध्ये कोणतीही ‘सेटिंग’ नव्हती म्हणून या पदावर मी बसू शकलो नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट टीम इंडियाचा माजी ओपनर आणि धडाडीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने केला आहे. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवागने हे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यातल्या वादाची चांगलीच चर्चा झाल्यानंतर जून महिन्यात अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाला रामराम ठोकला. अनिल कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते.

बीसीसीआयने अर्ज मागवल्यानंतर वीरेंद्र सेहवागसह इतर अनेकांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले होते. एका ओळीचा ट्विट करून सेहवागने सुरूवातीला अर्ज केला होता त्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. मात्र त्यानंतर त्याने बीसीसीआयच्या सांगण्यावरून रितसर अर्ज केला होता. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण या तिघांच्या सल्लागार समितीने इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. ज्यानंतर अखेर रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सेहवागला प्रशिक्षक पदाबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ”देखिये मै कोच इस लिये नहीं बन पाया क्योंकी जो लोग कोच चुन रहें थे उनसे मेरी कोई सेटिंग नहीं था” ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही खळबळजनक प्रतिक्रिया दिली. मी टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकेन असे मला कधीही वाटले नाही. मात्र बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि एम.व्ही. श्रीधर माझ्याकडे आले आणि या पदासाठी विचार कर, असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यानंतर मी काही वेळ जाऊ दिला विचार करूनच अर्ज केला असेही सेहवागने म्हटले आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलो होतो, तिथे रवी शास्त्रींना मी विचारले की तुम्ही प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला नाही का? मात्र तेव्हा रवी शास्त्री यांनी अर्ज करणार नाही असे उत्तर दिले. एवढेच नाही तर जी चूक केली ती पुन्हा करणार नाही, असे शास्त्री मला म्हणाले होते असेही सेहवागने म्हटले. सेहवागच्या या उत्तरांमुळे क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ माजली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Story img Loader