एखाद्या खेळाची विलक्षण ओढ असेल तर माणसे त्यामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपली पदरमोड करीत त्याग करतात. असाच अनुभव रक्षक स्पोर्ट्स हॉकी क्लबचे ज्येष्ठ खेळाडू श्रीपाद पेंडसे यांच्याबाबत दिसून येत आहे. हॉकीवरील निस्सीम प्रेमापोटी त्यांनी दुर्गम भागातील हॉकीच्या नैपुण्य विकासाचा वसा हाती घेतला आहे आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळू लागले आहे.
पेंडसे यांना हॉकीची विलक्षण आवड आहे. आपल्याला जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणे जमले नाही तरी आपण चांगले खेळाडू घडवू शकतो हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते साकार करण्यासाठी ते गेली दोन वर्षे परिश्रम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी जागतिक हॉकी लीगचे सामने पाहण्यासाठी त्यांनी चंडीगढ, नवी दिल्ली, जालंधर आदी ठिकाणचा दौरा केला. हे सामने पाहत असताना आपणही या राष्ट्रीय खेळाच्या विकासाकरिता काही तरी केले पाहिजे. त्याचवेळी वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळेतील मुलांना हॉकीचे प्रशिक्षण द्यावे असे त्यांच्या मनात आले. त्यांनी पंजाबमध्ये हॉकी स्टीक्स तयार करणाऱ्या कारखान्याशी संपर्क साधून पन्नास स्टीक्स व अन्य हॉकी कीट्सची ऑर्डर नोंदविली.
महाराष्ट्रात परत आल्यानंतर लगेचच त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर आपली संकल्पना मांडली. या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या योजनेला मान्यता दिली. तेथील ३०-३५ मुले शाळेसमोरील शेतात झाडाच्या जाड काठय़ा घेऊन हॉकी खेळत असत. या खेळाडूंना हॉकीकरिता रक्षक स्पोर्ट्स क्लबचे यशोवर्धन पवार, अ‍ॅड. उल्का सहस्रबुद्धे तसेच क्लबच्या अन्य अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली माणगाव येथे प्रशिक्षण देण्यास पेंडसे यांनी सुरुवात केली. भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाने त्यांचे मैदान या मुलांना सरावासाठी खुले केले.
खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच पोषक आहार, वैद्यकीय सुविधा, हॉकी कीट्स आदी सुविधा या मुलांना देण्याची जबाबदारीही पेंडसे यांनीच उचलली. गेली दोन वर्षे सुट्टीच्या दिवशी श्रीपाद व त्यांची पत्नी मंजिरी हे दोघेही या मुलांना खेळाबरोबरच वेगवेगळ्या संस्कारांबाबतही मार्गदर्शन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च या मुलांच्या हॉकी प्रशिक्षणासाठी केला आहे. ते हॉकीसाठी काहीतरी चांगले कार्य करीत आहेत हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पेंडसे यांच्या हॉकी प्रशिक्षण योजनेसाठी मदत करण्यास सुरुवात केली.
या मुलांना हॉकीचे प्रत्यक्ष मैदान कसे असते हे दाखविण्याच्या उद्देशाने पेंडसे यांनी या मुलांकरिता यंदा पुण्यातील स. प.  महाविद्यालयाच्या मैदानावर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. कर्नाटकमधील उगार खुर्द येथील शारीरिक शिक्षण प्रशिक्षक रमेश मठद यांनीही ग्रामीण परिसरात अनुभवी खेळाडू अरुण नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी शिबिर सुरू केले आहे. उगार येथील १५ ते २० मुले स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील शिबिरात सहभागी झाली आहेत. या सर्व खेळाडूंकरिता अशोक विद्यालयाने अल्प दरात निवास व भोजन व्यवस्था केली आहे. भोजनात खेळाडूंना पौष्टिक आहार मिळेल याची काळजीही घेण्यात आली आहे.
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटने नुकतीच या खेळाडूंची नैपुण्य चाचणी घेतली असून दोन-तीन मुलांना हॉकी प्रशिक्षण योजनेंतर्गत दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही पेंडसे यांच्या कामाचीच एक पावती ठरणार आहे.
पेंडसे यांचा उत्साह पाहून भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंग, तसेच संदीप सिंग यांनीही या खेळाडूंसाठी हॉकी कीट पाठवण्याची तयारी दर्शविली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर सरदारा स्वत: या खेळाडूंना कीट देण्यासाठी येणार आहे.