कॅरेबियन बेटांवर झालेल्या महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिलांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या महिलांनी भारतीय महिलांवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघाच्या या पराभवापेक्षा, उपांत्य सामन्यात मिताली राजला संघातून वगळण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. सामना संपल्यानंतर हरमनप्रीत कौर व प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुलजी यांनी मितालीला वगळण्याच्या निर्णयाचं समर्थनही केलं. यानंतर मितालीने बीसीसीआयला लिहीलेल्या पत्रात प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर आरोप करत, घडलेला प्रकार माझं करिअर संपवण्याचा कट असल्याचं म्हटलं होतं. याचसोबत पोवार यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचंही मितालीने म्हटलं होतं.

मितालीच्या या आरोपांनंतर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी आपली बाजू बीसीसीआयसमोर मांडली आहे. पोवार यांनी आज बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि मुख्य व्यवस्थापक साबा करीम यांनी मुंबईतल्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी बोलत असताना रमेश पोवार यांनी मितालीशी आपलं पटत नसल्याचं मान्य केलं आहे. मितालीला सांभाळणं अत्यंत कठीण असल्याचंही रमेश पोवारने बीसीसीआयला कळवलं आहे. याचसोबत उपांत्य फेरीत तिला संघातून वगळण्याचा निर्णय हा सांघिक असल्याचंही पोवार यांनी स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत याचा खुलासा केला आहे.

मितालीला संघातून वगळण्याचा निर्णय हा तिच्या खालावलेल्या बॅटींग स्ट्राईक रेट मुळे घेण्यात आला होता. याचसोबत संघ व्यवस्थापनाला विनींग कॉम्बिनेशन बिघडवायचं नसल्यामुळे मितालीला संघातून वगळण्यात आलं. हा निर्णय कोणत्याही आकसबुद्धीने घेतला नसल्याचंही पोवार यांनी स्पष्ट केलं. मात्र याच स्पर्धेत पाकिस्ताव व आयर्लंडविरुद्ध सामन्यात मितालीने अर्धशतकी खेळ करुन सामनावीराचा किताब पटकावला होता. या सामन्यांमध्ये तिचा बॅटींग स्ट्राईक रेट मध्ये आला नाही का? असा प्रश्न विचारला असता रमेश पोवारने शांत राहणं पसंत केलं.

रमेश पोवार यांना दिलेली हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी शुक्रवारी संपते आहे. यापुढे भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक नव्याने निवडण्यात येईल, रमेश पोवार यांना यावेळी आपला अर्ज दाखल करण्याची मूभा देण्यात आलेली असली, तरीही त्यांची पुन्हा या जागेवर निवड होईल याची खात्री देता येत नाही. विश्वचषकादरम्यान घडलेला प्रसंग लक्षात घेता बीसीसीआय व क्रिकेट प्रशासकीय समिती दुसऱ्या पर्यायाचा विचार करेल असा अंदाज बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

Story img Loader