मॅरेथॉन खेळी साकारणारा रॉस टेलर सामनावीर
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने आपल्या कसोटी कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन बळी घेऊन छाप पाडली. परंतु ‘वाका’ मैदानावरील न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी मात्र अनिर्णीतावस्थेत संपुष्टात आली.
ऑस्ट्रेलियाने उपाहाराच्या सुमारास दुसरा डाव ७ बाद ३८५ धावसंख्येवर घोषित करून न्यूझीलंडपुढे उर्वरित ४८ षटकांत सातच्या धावसरासरीने विजयासाठी ३२१ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर पावसामुळे तासाभराच्या खेळाचे नुकसान झाले. मग किवी संघाला विजय मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात आले. २० षटके बाकी असताना पाचव्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २ बाद १०४ धावा केल्या होत्या. रॉस टेलर आणि केन विल्यमसन अनुक्रमे ३६ आणि ३२ धावांवर नाबाद राहिले. जॉन्सनने टॉम लॅथम (१५)आणि मार्टिन गप्तील (१७) यांचे बळी मिळवले.
दुसरी कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे पहिली कसोटी २०८ धावांनी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चॅपेल-हॅडली करंडकावर आपले नाव कोरले आहे.

Story img Loader