प्रतिस्पर्धी खेळाडूला उद्देशून शेरेबाजी आणि टिप्पणी हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वैशिष्टय़. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात या शेरेबाजापुढे नमते न घेता प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या मिचेल जॉन्सनला उद्देशून भारतीय खेळाडूंनी जोरदार शेरेबाजी केली. मात्र ही खेळी भारताऐवजी जॉन्सनच्या पथ्यावर पडल्याचे उघड झाले आहे.
‘मी खेळपट्टीवर दाखल झालो तेव्हा आम्ही अडचणीच्या परिस्थितीत होतो. भागीदारी करणे अत्यावश्यक होते अन्यथा निकालाचे पारडे भारतीय संघाच्या दिशेने फिरले असते. मात्र फलंदाजी करताना आजूबाजूला शाब्दिक खेळी रंगल्यास मला आवडते. सुदैवाने भारतीय क्षेत्ररक्षकांनी हेच केले आणि मला मोठी खेळी करण्यासाठी फायदा झाला,’ असे खुद्द जॉन्सननेच सांगितले.
 भारतीय संघाच्या ४०८ धावांसमोर खेळताना ऑस्ट्रेलियाची ६ बाद २४७ अशी अवस्था झाली होती. त्या वेळी जॉन्सन खेळायला आला. त्याने ८८ धावांची निर्णायक खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथसह त्याने १४८ धावांची भागीदारी साकारत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

Story img Loader