आयपीएलच्या मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ तळाच्या स्थानावर होता. मात्र नवख्या गुजरात लायन्सला हरवून नवव्या हंगामाचा विजयी आरंभ करण्यास पंजाबचा संघ उत्सुक आहे.
पंजाबच्या संघाने यंदाच्या हंगामासाठी कोणत्याही मोठय़ा खेळाडूला खरेदी केलेले नाही. फक्त ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीच्या जागी नेतृत्वाची धुरा दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरकडे सोपवण्यात आली आहे. निवृत्त वीरेंद्र सेहवाग संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मालकीच्या पंजाब संघाची वाटचाल मिलर, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मुरली विजय आणि मिचेल जॉन्सन यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्याव्यतिरिक्त अष्टपैलू फरहान बेहरादिन, मार्क्स स्टॉयनिस, वेगवान गोलंदाज मोहित शर्मा आणि डावखुरा फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंग यांच्याशिवाय फारसे लक्षवेधी खेळाडू नाहीत. मागील हंगामात पंजाबच्या फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव आढळला होता आणि जेव्हा फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तेव्हा गोलंदाजांची कामगिरी खराब झाली.
सोमवारी आयपीएलमधील आपला पहिलावहिला सामना खेळणाऱ्या गुजरात लायन्सचा संघ तुलनेने अधिक मजबूत आहे. स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम, कर्णधार सुरेश रैना, आरोन फिन्च, अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि जेम्स फॉकनर यांच्यासारख्या ट्वेन्टी-२० विशेषज्ञ दिग्गजांवर गुजरातची मदार आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात मात्र गुजरातची कमजोरी दिसून येते. दक्षिण आफ्रिकेचा जागतिक कीर्तीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन वेगळता त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची वाणवा आहे. त्यांच्याकडे काही मध्यमगती गोलंदाज जरूर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा