ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन स्नायूंच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या क्रिकेट कसोटीत खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ अ‍ॅलेक्स कॉन्टुरिस यांनी सांगितले, ‘‘तिसऱ्या कसोटीतच जॉन्सनच्या उजव्या पायामध्ये स्नायूंच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो जरी कसोटीत खेळू शकणार नसला तरी आगामी तिरंगी एकदिवसीय मालिकेत तो सहभागी होऊ शकेल.’’
 तिरंगी मालिकेत भारत, ऑस्ट्रेलियासह इंग्लंडचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली होती.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाले, ‘‘जॉन्सनची दुखापत फारशी गंभीर नसली तरी आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली तर तो आणखी प्रभावी गोलंदाजी करू शकेल.’’ अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने रविवारी पोटातील दुखण्यामुळे सरावातून लवकर माघार घेतली. तो पुन्हा सोमवारी सराव करू शकेल, असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जॉन्सनच्या जागी मिचेल स्टार्क व पीटर सिडेल यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा