मिचेल जॉन्सन हे नावच इंग्लंडच्या फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारे आहे हे दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत पुन्हा सिद्ध झाले. ऑस्ट्रेलियाच्या ५७० धावांसमोर खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांनी मिचेल जॉन्सनच्या वेगवान गोलंदाजीपुढे लोटांगण घातले. जॉन्सनच्या भेदक माऱ्यापुढे १ बाद ३५ वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव १७२ धावांतच गडगडला आणि इंग्लंडपुढे आणखी एका दारुण पराभवाचे सावट दाटले.
४० धावांत ७ बळी घेत जॉन्सनने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. कारकिर्दीत डावात पाच बळी घेण्याची जॉन्सनची ही नववी वेळ आहे. ट्रॉटच्या ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर जो रूटला बढती देण्याचा इंग्लंडचा निर्णयही फसला. अनुभवी केव्हिन पीटरसन संघाच्या विश्वासाला पात्र ठरू शकला नाही आणि ४ धावा काढून तंबूत परतला.
बेन स्टोक्सला पदार्पणाची संधी देण्याचा निर्णयही इंग्लंडसाठी फायद्याचा ठरला नाही. यष्टीरक्षक मॅट प्रॉयरचा खराब फॉर्म इंग्लंडसाठी चिंतेचा विषय झाला आहे. स्टुअर्ट ब्रॉड, ग्रॅमी स्वान या फलंदाजी करू शकणारे गोलंदाज जॉन्सनसमोर निष्प्रभ ठरले. इयान बेलने चिवटपणे झुंज देत नाबाद ७२ धावांची खेळी केली. सलामीवीर मायकेल कारबेरीने संघर्ष करत ६० धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लियॉन, पीटर सिडल आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी १ बळी घेत जॉन्सनला चांगली साथ दिली.
३९८ धावांची प्रचंड आघाडी मिळूनही ऑस्ट्रलियाने इंग्लंडला फॉलोऑन दिला नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची २ बाद ४ अशी अवस्था झाली होती मात्र यानंतर मायकेल क्लार्क आणि डेव्हिड वॉर्नर यांनी भागीदारी करत पडझड थांबवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १३२ धावा झाल्या आहेत. वॉर्नर ८३ तर स्टीव्हन स्मिथ २३ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडे ५३० धावांची दमदार आघाडी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा