ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शचा दावा

केवळ भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठीच नव्हे तर सर्व भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी आमच्याकडे योजना तयार आहेत. कुणाला तसे वाटत नसेल तर ते मूर्ख आहेत, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने त्यांच्या तयारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर ताशेरे ओढले.

भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी प्रत्येक गोलंदाजाने वेगवेगळ्या योजना तयार केल्या असल्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘‘प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी त्या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. विराट हा मोठा खेळाडू आहे, हे सर्वज्ञात आहे. त्याच्यासाठी आमच्या योजना आहेतच. पण कुणाला असे वाटत असेल की अन्य फलंदाजांबाबत आम्ही तयारी केलेली नाही, तर ते चुकीचे आहेत, असेच म्हणावे लागेल. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीत अनुभवाची असलेली कमतरता आणि नवखे चेहरे याकडे आम्ही संधी म्हणून पाहतो. आता कसोटीबद्दल वेगवेगळ्या प्रकारची खूप चर्चा झाली असून प्रत्यक्ष मैदानावर उतरून सांघिकरीत्या सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वाटते,’’ असे मार्शने सांगितले.

‘‘रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव हे भारताचे तिघेही फिरकी गोलंदाज हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. मात्र, इतिहासाकडे बघितल्यास भारतात हे फिरकी गोलंदाज जेवढे यशस्वी ठरतात, तेवढे ते ऑस्ट्रेलियात कधीच यशस्वी होत नाहीत. पण ते खूप दर्जेदार गोलंदाज असल्याने त्यांचा सामना करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. भारतीय फिरकी आणि आमची फलंदाजी ही खूप रंगतदार लढत होणार आहे,’’ असेही मार्शने सांगितले.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत फारशी दमदार कामगिरी करू न शकलेल्या मार्शला ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाची मधली फळी सांभाळण्याची धुरा त्याच्यासह भाऊ शॉन मार्शवर येणार आहे.

Story img Loader