Mitchell Marsh on Jasprit Bumrah Video: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. फलंदाजीसह गोलंदाजीतही तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर श्रीलंकेविरूद्ध कसोटी सामन्यासाठीही त्याला संघात संधी मिळाली नाही. यानंतर आता मिचेल मार्श दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी संघातूनही बाहेर पडला. मार्शने आता खुलासा केला आहे की जसप्रीत बुमराहविरुद्ध फ्लॉप झाल्यानंतर त्याची भीती अजूनही त्याच्या डोक्यातून जात नसल्याचे त्याने सांगितले. मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्समध्ये त्याच्या घराच्या गार्डनमधील एक किस्सा सांगितला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड सोहळ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू पोहोचले होते. स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडची सर्वोच्च ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेटपटूसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ॲलन बॉर्डर पदकासाठी निवड करण्यात आली तर युवा अष्टपैलू ॲनाबेल सदरलँड हिला सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूसाठी बेलिंडा क्लार्क पदक प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये १४२७ धावा करणाऱ्या हेडने २०८ मतांसह अव्वल पुरस्काराचा मान पटकावला. यादरम्यान बोलतानाच मिचेल मार्शने बुमराहबाबतचा किस्सा सांगितला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्समध्ये मिचेल मार्शने सांगितले की, ‘माझा भाचा आहे टेड, तो चार वर्षांचा आहे. मी त्याच्यासोबत बॅकयार्डमध्ये क्रिकेट खेळत होतो. त्यानंतर अचानक त्याने जसप्रीत बुमराहच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि पुन्हा तेच भयानक स्वप्न. त्याचे शब्द ऐकून अँकरसह उपस्थित सर्वजण हसू लागले. मिचेल मार्शने विनोदी अंदाजात हे सांगितले पण बुमराहने संपूर्ण बॉर्डर-गावस्कर मालिकेत मार्शला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहविरुद्ध मिचेल मार्शला धावा करण्याची संधी मिळाली नाही. या मालिकेत तो तीनदा बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या दोन कसोटीत बुमराह त्याला बाद करू शकला नाही, पण बुमराहने पुढच्या दोन कसोटींच्या तीन डावांत त्याची विकेट घेतली. मार्शला दुखापत झाल्यामुळे अखेरची कसोटी त्याला खेळता आली नाही. भारताविरूद्ध कसोटी मालिकेत मार्शने ७ डावांमध्ये केवळ ७३ धावा केल्या, ज्यात ४७ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती.

तर या मालिकेत बुमराहचे वर्चस्व होते, त्याने ३२ विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव आणला. ऑस्ट्रेलियन भूमीवर परदेशी वेगवान गोलंदाज म्हणून आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक ३९ मेडन षटकं टाकली. त्याची गोलंदाजीची सरासरी केवळ १३.०६ होती.

Story img Loader