Mitchell Marsh World Cup Trophy Controversy: वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव करून सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या एका खेळाडूने ट्रॉफीवर पाय ठेवत फोटो काढल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या रागाला सामोरे जावे लागले. ड्रेसिंग रूममधून मिचेल मार्शचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. या चित्रावरून बराच गदारोळ झाला होता. सोशल मीडिया यूजर्सनी त्याच्यावर तू ट्रॉफीचा अनादर केला आहेस, अशी टीका देखील केली होती. त्याचवेळी मोहम्मद शमीचे वक्तव्यही समोर आले, ज्यात त्याने मार्शवर निशाणा साधला. मार्शने अशी कृती केल्याचे पाहून आम्हा सर्वांच्या भावना दुखावल्याचे शमीने म्हटले होते. आता ११ दिवसांनंतर मार्शने या संपूर्ण घटनेवर मौन सोडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेवर मिशेल मार्श काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियन मीडियाशी बोलताना या अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, असे करून ट्रॉफीचा अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता. मार्श म्हणाला, “साहजिकच त्या चित्रात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मी याबद्दल फारसा विचार केला नाही. मी सोशल मीडियावर फारसे पाहिले नाही. होय, हे प्रकरण चिघळले होते मात्र, आता त्यावरची चर्चा थांबली आहे. असे जरी असले तरी त्या चित्रात वादग्रस्त असे काहीही नव्हते.”

हेही वाचा: IND vs SA: पुजारा-रहाणेची कारकीर्द संपली? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून पत्ता कट झाल्याने सोशल मीडियात चर्चेला उधाण

ऑस्ट्रेलियन सेन रेडिओ नेटवर्कवर निवेदकाने त्याला पुढे प्रश्न विचारला की, “ती कृती तू पुन्हा करशील का? असे विचारले असता, मार्श म्हणाला, “होय, मी पुन्हा तसेच करेन. मला नक्कीच आशा आहे की, सर्व क्रिकेट चाहते मला समजून घेतील. मी प्रामाणिकपणे सांगतो कारण, त्यात अपमानास्पद काहीही नव्हते. मी त्याचा तसा फारसा विचार केला नाही. मी फारसे सोशल मीडियाकडे पाहिलेही नाही. त्यात मला वाईट असे काहीही वाटत नव्हतं.”

मार्शविरुद्ध तक्रार प्राप्त झाली

मार्शचा या घटनेवर, उत्तर प्रदेशातील एका कार्यकर्ता गटाच्या नेत्याने गेल्या आठवड्यात या अष्टपैलू खेळाडूविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. भ्रष्टाचारविरोधी सेना प्रमुख पंडित केशव देव यांनी अलीगडच्या दिल्ली गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अलिगढचे पोलीस अधीक्षक (शहर) म्हणाले की, “तक्रार मिळाली आहे, परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि सायबर सेलकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाईल.”

हेही वाचा: “मी अद्याप करारावर…”, BCCIने कार्यकाळ वाढवण्याच्या घोषणेवर द्रविडचे बुचकळ्यात टाकणारे वक्तव्य

ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे

मार्शला ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती, परंतु स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅडम झाम्पासह अनेक विश्वचषक विजेते या मालिकेत भाग घेण्यासाठी थांबले होते. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० नंतर विश्वचषक खेळलेल्या सर्व खेळाडूंना बोलावले आहे. चौथ्या आणि पाचव्या टी-२० मध्ये पूर्णपणे नवीन संघ खेळेल. भारत सध्या या मालिकेत २-१ ने आघाडीवर असून चौथा टी-२० सामना आज रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने पहिले दोन टी-२० जिंकले, तर तिसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर सामना जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell marsh who stepped on the world cup trophy broke his silence after 11 days gave this statement on the incident avw