India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ११ षटकांत १२१ धावा करत सामना जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पाच विकेट्स घेत ब्रेट लीचा विक्रम मोडला.
स्टार्कने ब्रेट लीचा विक्रम मोडला –
मिचेल स्टार्कने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९व्यांदा पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याचबरोबर याबाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा विक्रम मोडला आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी वनडेमध्ये सर्वात जलद पाच विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. स्टार्कने १०९ डावात हा टप्पा गाठला, तर ब्रेट लीने २१७ एकदिवसीय डावात ९व्यांदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. या गोलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या स्थानावर आहे. मॅकग्रॉने २४७ डावात सातवेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
स्टार्कने या पाच खेळाडूंना केले बाद –
विशाखापट्टणम वनडे बद्दल बोलायचे झाले, तर टीम इंडिया नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला उतरली आणि खराब सुरुवात झाली. अवघ्या ४९ धावांवर भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टार्कने पहिल्याच षटकात सलामीवीर शुबमन गिलला (०) बाद केले. त्याने पाचव्या षटकात कर्णधार रोहित शर्मा (१३) आणि सूर्यकुमार यादव (०) यांना आपल्या जाळ्यात अडकवले. स्टार्कने नवव्या षटकात केएल राहुलला (९) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचवेळी मोहम्मद सिराज (०) स्टार्कचा पाचवा बळी ठरला. भारताकडून बाद झालेला सिराज हा शेवटचा खेळाडू होता.
भारताचा डाव –
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले, तर भारताचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्ये (प्रारंभिक १० षटके) पॅव्हेलियनमध्ये परतला. ना रोहित शर्मा चालला ना हार्दिक पांड्या. शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. परिस्थिती अशी होती की 11 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने नाबाद २९ धावा करत संघाला १०० धावांच्या पुढे नेले. रवींद्र जडेजाने १६ आणि रोहित शर्माने १३ धावा केल्या. केएल राहुल नऊ आणि हार्दिक पांड्या केवळ एक धाव करू शकले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच आणि शॉन अॅबॉटने तीन विकेट्स घेतल्या. नॅथन एलिसला दोन विकेट मिळाल्या.