Mitchell Starc said Aus is my first priority irrespective: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताविरुद्ध २०९ धावांनी विजय मिळवून ऑस्ट्रेलियन संघाने आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकली. आता सर्व फॉरमॅटमध्ये आयसीसीचे जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ बनला आहे. त्याचवेळी या सामन्यात भारतीय संघाला पराभवानंतर सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएलबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेला गोलंदाज मिचेल स्टार्क याने विजयानंतर द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला आयपीएलमध्ये खेळणे आणि यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळताना खूप आनंद झाला. पण माझ्या देशासाठी खेळणे हे नेहमीच माझे पहिले प्राधान्य असते. टी-२० लीगमध्ये खेळण्याबद्दल मला कोणतीही शंका नाही. पैसा येत जात राहील. पण मला मिळालेल्या संधींसाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.”
ऑस्ट्रेलियाकडून दीर्घकाळ खेळणे हे माझे पहिले प्राधान्य –
मिचेल स्टार्क पुढे म्हणाला की, “कसोटी क्रिकेटचा इतिहास १०० वर्षांहून जुना आहे. ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत जवळपास ५०० पेक्षा पुरुष खेळाडू खेळले आहेत, ज्यामुळे ते स्वतःच खूप खास आहे. मी पारंपारिक विचार करतो आणि आशा करतो की येणारी पिढी कसोटी क्रिकेटला प्राधान्य देईल. मला पुन्हा आयपीएल खेळायला नक्कीच आवडेल. पण ऑस्ट्रेलियाकडून दीर्घकाळ खेळणे हे माझे पहिले प्राधान्य आहे मग ते कोणताही फॉरमॅट असो.”
आयपीएलच्या थकव्याचा परिणाम भारतीय गोलंदाजांवर दिसला –
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे आयपीएलमध्ये सलग दोन महिने खेळल्यानंतर, संघ थेट या सामन्यात खेळण्यासाठी पोहोचला. त्यामुळे भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यापूर्वी तयारीसाठी पूर्ण वेळ मिळू शकला नाही. यासोबतच सामन्यादरम्यान जास्त गोलंदाजी केल्यामुळे ते थकलेलेही स्पष्ट दिसत होते.