भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला आहे. ती सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरली आहे. तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोच एडवर्डला मागे टाकले. ३८ वर्षीय मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता १०३३७ धावा झाल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये १०२७३ धावा काढण्याचा विक्रम एडवर्डच्या नावावर आहे. या यादीमध्ये न्यूझीलंडची सुझी बेट्स ७८४९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या सामन्यात फलंदाजी करताना मिताली दुखापतग्रस्त झाली. पण पुढच्याच सामन्यात तिने पुनरागमन केले आणि दमदार अर्धशतक ठोकले. तिच्या कामगिरीमुळे इंग्लंडला निर्भेळ यश मिळवता आले नाही. भारताच्या माजी कर्णधार शांता रंगस्वामी यांनी मितालीला महिला क्रिकेटमधील ‘सचिन तेंडुलकर’ अशी उपाधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा तिचा विक्रम आपल्याकडे जास्त काळ राहील, असे रंगास्वामी म्हणाल्या.
The leading run-scorer across formats in women’s cricket
Take a bow, @M_Raj03! #ENGvIND pic.twitter.com/cykCZCtQwk
— ICC (@ICC) July 3, 2021
असा रंगला सामना…
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेरच्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडला चार गड्यांनी पराभूत केले. या पराभवानंतरही इंग्लंडने मालिका २-१ने जिंकली. पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१९ धावा केल्या. स्किव्हरने त्यांच्यासाठी सर्वाधिक ४९ धावा केल्या, तर कर्णधार हेदर नाइटने ४६ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने ४७ धावा देऊन तीन बळी घेतले.
भारतीय संघालाही विजय नोंदवण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागले. तीन चेंडू आणि चार गडी राखून भारतीय संघाने २२० धावा करत हा सामना जिंकला. कर्णधार मिताली राजने ८६ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावा केल्या. स्मृती मंधानानेही ४९ धावांची खेळी साकारली. अष्टपैलू स्नेह राणाने २४ महत्त्वपूर्ण धावा केल्या.
आणखी एक विश्वविक्रम!
मिताली राजच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला आहे. मिताली जगातील सर्वाधिक वनडे सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे. ५० षटकांच्या फॉर्ममध्ये कर्णधार म्हणून तिचा हा ८४ वा विजय आहे. यात, तिने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या ८३ विजयांच्या विक्रमाला मागे टाकले.