एकदिवसीय क्रिकेटमधील यशानंतर कर्णधार मितालीचे मत

ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय या क्रिकेट प्रकारांमुळे महिला क्रिकेट अधिक उंचावेल, परंतु जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटू देशात घडण्यासाठी कसोटी सामन्यांची संख्या आणखी वाढण्याची आवश्यकता आहे, असे मत भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या विशेष सत्कार कार्यक्रमात महिला संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी कसोटी क्रिकेट सामन्यांचे महत्त्व अधोरेखित करताना मिताली म्हणाली, ‘‘ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिका ही महिला क्रिकेटमधील एकमेव नियमित मालिका आहे. मात्र अन्य संघ मर्यादित षटकांचे क्रिकेटच खेळणे अधिक पसंत करतात. भारतीय महिला संघ गेल्या दहा वर्षांत फक्त ५ कसोटी सामने खेळला आहे.’’

‘‘कसोटी सामन्यांमध्ये क्रिकेटपटूंच्या खेळाची खरी कसोटी लागते. मात्र महिला क्रिकेटला अधिक उत्तेजनाची आवश्यकता आहे आणि ते मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या माध्यमातून विविध संघटना करीत आहेत,’’ असे मितालीने सांगितले.

‘‘मर्यादित षटकांच्या सामन्यांप्रमाणेच ठरावीक अंतराने कसोटी सामने व्हायला हवेत, असे मला वाटते. त्यामुळे दर्जेदार खेळाडू घडण्यास मदत होईल. जर भारतीय संघ कसोटी खेळू लागला, तर अन्य संघांमध्येसुद्धा ही लाट येईल,’’ असे मितालीने सूतोवाच केले.

नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा वर्षांव होतो आहे. त्यामुळे भारावलेली मिताली म्हणाली, ‘‘बीसीसीआयने महिला क्रिकेट आपल्या आधिपत्याखाली आणण्याअगोदर आणि नंतरचे दिवस मी पाहिले आहेत. सुदैवाने मी खेळत राहिले आहे. महिला क्रिकेटमधील हा टप्पा मी पाहात आहे. देशात ज्या पद्धतीने आमचे स्वागत होते आहे, ते भारावणारे आहे.’’

‘‘महिला क्रिकेटच्या विकासात भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे योगदान आहे. जर रेल्वेने नोकरीचा आधार दिला नसता, तर अनेक गुणी क्रिकेटपटूंनी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने खेळ सोडला असता,’’ असे मितालीने सांगितले.

मिताली राजला बढती

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला दक्षिण-मध्य रेल्वेच्या हैदराबाद येथील मुख्यालयात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) म्हणून बढती दिली आहे. मिताली याआधी मुख्य कार्यालय अधीक्षक म्हणून काम पाहात होती.

 

भारतीय महिला क्रिकेटपटूंचा क्रीडामंत्र्यांकडून गौरव

नवी दिल्ली : आयसीसी महिला विश्वचषक स्पध्रेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा गुरुवारी नवी दिल्ली येथे क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी सत्कार केला. ‘‘महिला क्रिकेटपटूंचे हे यश देशातील युवकांना क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द म्हणून पाहण्यासाठी प्रेरित करेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंग्लंड येथील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिलांना अंतिम लढतीत यजमानांकडून पराभव पत्करावा लागला. उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी महिला क्रिकेटपटूंच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. सत्कार कार्यक्रमात गोयल म्हणाले, ‘‘भारतीय महिला क्रिकेटपटूंनी फारच चांगली कामगिरी केली आणि त्याचे कितीही कौतुक केले, तरी ते कमीच आहे. या स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांनी देशवासीयांची मने जिंकून ती अंतिम लढत जिंकली, असे मला वाटते.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘या क्रिकेटपटूंनी युवकांसाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे. विशेषत: युवा महिलांना खेळाकडे कारकीर्द म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिली. रिओ ऑलिम्पिक ते पॅरालिम्पिक स्पर्धा, मग हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन आणि आता महिला विश्वचषक स्पर्धा.. भारतीय महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत.’’

रेल्वेकडून दहा महिला क्रिकेटपटूंना बक्षीस

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत कार्यरत असलेल्या महिला क्रिकेट संघातील दहा खेळाडूंना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एक कोटी ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. ‘‘भारतीय संघातील १५ पैकी १० खेळाडू रेल्वेच्या सेवेत आहेत आणि ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’’ असे प्रभू यांनी सांगितले.