भारताच्या एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजचे मत
वैयक्तिक कामगिरीच्या बळावर सामना जिंकू शकतो. मात्र मालिका जिंकायची असेल, तर संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची असते. याच कामगिरीच्या बळावर सांघिक लक्ष्य साध्य करता येते, असे मत भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केले. डब्ल्यू. व्ही. रामन यांच्यासारखा अनुभवी व्यक्ती प्रशिक्षक लाभल्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीत फरक पडेल, असा विश्वास तिने प्रकट केला.
माजी प्रशिक्षक रमेश पोवार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे मिताली वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र आता नवे प्रशिक्षक रामन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी मिताली सज्ज झाली आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मिताली म्हणाली, ‘‘प्रशिक्षक आणि खेळाडू यांची विचारसरणी सारखी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मी रामन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच खेळणार असले, तरी बऱ्याचदा त्यांना भेटले आहे. ते उच्च दर्जाचा खेळ खेळले आहेत, तसेच मातब्बर संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.’’
भारतीय संघाच्या आगामी आव्हानाविषयी मिताली म्हणाली, ‘‘न्यूझीलंड दौऱ्यावरील मालिका जिंकणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत आगेकूच करणे, ही आमच्यापुढील प्रमुख लक्ष्ये आहेत.’’