दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज उपललब्ध असेल. परंतु पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर युवा खेळाडूंकडे लक्ष केंद्रित करणारी निवड समिती मितालीला भारतीय संघात स्थान देऊ शकेल का, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
३६ वर्षीय मितालीकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व आहे. २०२१मध्ये होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत खेळत राहणार असल्याचे मितालीने सांगितले आहे. परंतु ट्वेन्टी-२० संघात मात्र तिची थेट निवड होऊ शकत नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला २४ सप्टेंबरपासून सूरतला प्रारंभ होणार आहे. राष्ट्रीय निवड समितीची बैठक ५ सप्टेंबरला मुंबईत होणार असून, पहिल्या तीन सामन्यांसाठी भारताची संघनिवड करणार आहे.