भारतीय महिला संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मिताली राजने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेहक फातिमा या चिमुरडीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मितालीने तिला मदत करण्याचे जाहीर केले आहे. केरळ राज्यातील कोझिकोड या छोट्याशा गावात एक मुलगी क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्विटरवरील एका चाहत्याने या मुलीच्या भविष्यासाठी मितालीकडे मदत मागितली. यावर खुद्द मितालीने आपली प्रतिक्रिया दिली.
व्हिडिओमध्ये ६ वर्षीय मेहक फातिमा फलंदाजीत जबरदस्त फटकेबाजी करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ”या मुलीला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादांची गरज आहे”, असे एका ट्विटर युजरने मितालीला टॅग करत म्हटले. या व्हिडिओला मितालीने प्रत्युत्तर देत म्हटले, ”मी या मुलीला माझा आशीर्वाद आणि पाठिंबा दोन्ही देईन.”
फोटोगॅलरी – महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं केलं रक्तदान, पाहा फोटो
Tweet of the day! @M_Raj03 she needs your support & blessings!! Thanks @thebetterindia for sharing it. https://t.co/bG29qo3t1m
— KunalSarangi (@KunalSarangi) June 12, 2021
She has both my support and blessings . All little girls keen to pursue the sport always have my blessings. Her parents can DM me regarding any assistance they need .
— Mithali Raj (@M_Raj03) June 13, 2021
मिताली एवढ्यावरच थांबली नाही, ती पुढे म्हणाली, ”या खेळात पुढे जाण्याची इच्छा असलेल्या सर्व लहान मुलींना माझा नेहमीच आशीर्वाद आहे. या मुलीचे पालक मला कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी थेट मेसेज करू शकतात.” मिताली राजच्या उत्तरानंतर युजरने तिचे आभार मानले. ”मी आता तुमचा हा निरोप मुलीच्या पालकांना देत आहे आणि इंग्लंड दौर्यासाठी तुम्हाला शुभेच्छा”, असे त्याने आभार मानताना म्हटले.
मिताली सध्या इंग्लंड दौऱ्यावर
मिताली सध्या टीम इंडियासह इंग्लंड दौर्यावर आहे. भारतीय महिला संघाला इंग्लंड दौर्यावर एक कसोटी सामना, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामना १६ पासून सुरू होईल. मिताली राज कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.