मलेशिया ग्रां.प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने संमिश्र यश मिळवले. आरएमव्ही गुरुसाईदत्त, के. श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी सलामीच्या लढती जिंकल्या, तर अन्य बॅडमिंटनपटूंना पुरुष एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
११व्या मानांकित गुरुसाईदत्तने सिंगापूरच्या चाओ हुआंग याचा २१-१९, १४-२१, २१-१७ असा पाडाव केला. त्याची दुसऱ्या फेरीत गिआप चिन गोह याच्याशी गाठ पडेल. समीरने मलेशियाच्या वेई जियान आय याचा २१-१०, २१-९ असा धुव्वा उडवला. त्याला पुढील फेरीत मलेशियाच्या चौथ्या मानांकित वेई फेंग चोंग याचा सामना करावा लागेल. श्रीकांतने कोरियाच्या संग मिन पार्क याला २१-१३, २१-११ असे पराभूत केले. श्रीकांतला विजय मिळवण्यासाठी २७ मिनिटे लागली. त्याला पुढील फेरीत सुप्पान्यू अविहिंगसासोन याच्याशी झुंज द्यावी लागेल.
ऑस्कर बंसल आणि अभिमन्यू सिंग यांना पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. बंसलला मलेशियाच्या बेर्यनो जियान झे वाँग याच्याकडून २१-७, १६-२१, १५-२१ अशी हार पत्करावी लागली. हाँगकाँगच्या यान किट चानविरुद्धच्या सामन्यात अभिमन्यू कोर्टवर उतरला नाही. त्यामुळे चान याला पुढे चाल देण्यात आली. टॉमी सुगिआटरे याने माघार घेतल्यामुळे भारताच्या एच. एस. प्रणयला पुढे चाल मिळाली होती.

Story img Loader