भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शिस्तपालन समितीने आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना दोषी ठरवले असून, त्यांच्याविरोधात बेशिस्त वर्तन आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आठ आरोप निश्चित केले आहेत. हे सर्व आरोप आर्थिक आणि प्रशासकीय बाबींमध्ये गैरव्यवहारप्रकरणी ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर बीसीसीआय निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीतील अरुण जेटली, चिरायू अमीन आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मोदी यांच्याविरोधात १३४ पानी आरोपपत्र दाखल केले असून, बीसीसीआयला सुपूर्द केले आहे. बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा २५ सप्टेंबरला होणार असून यामध्ये याबाबतीतला निर्णय घेण्यात येईल. हे आरोप दाखल झाल्यावर मोदी यांनी जेटली यांच्यावर काही आरोप केले आहेत. जेटली हे एन. श्रीनिवासन यांचे निकटवर्तीय आहेत, त्याचबरोबर ते पक्षपातीपणा करत आहेत, असे आरोप मोदी यांनी केले आहेत.

Story img Loader