‘अब की बार मोदी सरकार’ या घोषणेने भारताच्या राजकारणात जसा बदल मतदानोत्तर सर्वेक्षणामध्ये दिसत आहे, तशीच ही मोदींची लाट भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्येही (बीसीसीआय) येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) नरेंद्र मोदी अध्यक्ष आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अमित शाह हे उपाध्यक्ष आहेत. आता मोदी एकीकडे भारताच्या पंतप्रधानपदासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात असून दुसरीकडे शाह बीसीसीआयचे उपाध्यक्ष होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सप्टेंबरमध्ये बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष रवी सावंत यांच्या जागी पश्चिम विभागातून बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदावर शाह यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत जीसीएचे संयुक्त सचिव राजेश पटेल म्हणाले की, ‘‘बीसीसीआयचे उपाध्यक्ष होण्याच्या दृष्टीने शाह यांनी योग्य पावले उचलली असून त्यासाठीचा राजमार्गही बनवून पूर्ण केला आहे. शाह हे उपाध्यक्ष होण्यासाठी पात्र आहेत. यापूर्वी त्यांनी बीसीसीआयच्या दोन वार्षिक सर्वसाधारण सभांनाही उपस्थिती लावली आहे.’’
सध्या मोदी आणि शाह हे दोघेही निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. शाह यांचा मुलगा जय हा देखील जीसीएच्या संयुक्त सचिवपदावर आहे. याबाबत बीसीसीआयमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘बीसीसीआयमध्ये शाह यांचा प्रवेश ही फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ते उपाध्यक्षपदावर बिनविरोधपणे निवडून येतील, अशी आशा आहे. जर मोदी पंतप्रधान झाले तर शाह यांची बीसीसीआयमधील भूमिका फार महत्त्वाची असेल.’’
एन. श्रीनिवासन यांच्याविरोधामध्ये पश्चिम विभागातील मुंबई, महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि बडोदा ही क्रिकेट मंडळे होती. पण या वेळी जीसीएने तटस्थपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे शाह हे सहजपणे बीसीसीआयचे उपाध्यक्ष होतील, असे म्हटले जात आहे. यापूर्वी जीसीएकडून नरहरी अमिन यांनी बीसीसीआयमध्ये उपाध्यक्षपद भूषवले होते. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अमिन सध्या भाजपमध्ये असून त्यांच्याकडून गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद मोदी यांनी मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा