भारताविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोईन अलीने, क्रिकेट जगतात एक आरोप करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. २०१५ साली पार पडलेल्या अॅशेल मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्याविरोधात वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केलाय. यानंतर २०१७ च्या अॅशेल मालिकेतही आपल्यासोबत हाच प्रकार घडल्याचं मोईन अलीने म्हटलंय. ३१ वर्षीय मोईन अली आपलं आत्मचरित्र प्रकाशीत करण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस मोईन अलीचं हे आत्मचरित्र वाचकांना मिळणार आहे. या आत्मचरित्रात अलीने वर्णद्वेशी टिप्पणीचे प्रसंग नमूद केले आहेत.
“२०१५ सालची अॅशेल मालिका ही माझ्यादृष्टीने अत्यंत महत्वाची होती. इतर खेळाडूंप्रमाणे माझी कामगिरीही या मालिकेत उल्लेखनीय झाली होती. मात्र एका प्रसंगामुळे माझं खेळावरचं लक्ष विचलीत झालं. एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने मला, ओसामा म्हणत हिणवलं. सर्वात प्रथम मी जे ऐकतोय त्याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी पहिल्यांदाच कोणावरतरी इतका रागावलेला होतो.” २०१५ साली झालेल्या कार्डिफ कसोटीत मोईन अलीने ७७ धावा काढून ५ बळी घेतले होते. टेलिग्राफ वृत्तपत्राशी मोईन अली बोलत होता.
यानंतर हा प्रसंग मी माझ्या सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितला. प्रशिक्षक ट्रेवर बायलिस यांनी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्याकडे याविषयी विचारणा केली. लेहमन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंना विचारलं असता, त्या खेळाडूने आपण असं काही बोललोच नसल्याचं म्हटलं. त्यावेळी मी तिकडे एकटाच असल्यामुळे मी तो आरोप सिद्ध करु शकणार नव्हतो, त्यामुळे मला शांत रहावं लागलं. मात्र त्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू हे अतिशय उद्दाम वागत असल्याचंही मोईन अली म्हणाला. सध्या भारताविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यातचं मोईन अलीने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या आत्मचरित्रात आणखी काय बाबी असतील याची उत्सुकता सर्वांमध्ये लागून राहिलेली आहे.