Moeen Ali retirement from International Cricket : सध्या इंग्लंड संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दरम्यान, इंग्लंडच्या एका दिग्गज खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मोईन अली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का आहे. इंग्लंड क्रिकेट संघात मोईन अलीचे योगदान खूप महत्त्वाचे होते. त्याने इंग्लंडला दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. ज्यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३७ वर्षीय मोईनने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर त्याने खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला की मी इंग्लंडसाठी भरपूर क्रिकेट खेळलो आहे आणि आता नव्या पिढीसाठी मार्ग मोकळा करण्याची वेळ आली आहे. मोईन अली हा एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू होता, जो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असायचा. त्याने एकदा भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेत एकट्याने इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.

मोईन अलीची चमकदार कारकीर्द

मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ६८ कसोटी, १३८ एकदिवसीय आणि ९२ टी-२० सामने खेळले. त्याने इंग्लंडसाठी ८ शतके आणि २८ अर्धशतकांसह एकूण ६६७८ धावा केल्या आणि ३६६ विकेट्सही घेतल्या. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा भारताविरुद्धचा टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामना होता, ज्यात इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – Duleep Trophy : एकेकाळी इंग्लंडचा केव्हिन पीटरसन दुलीप ट्रॉफीत ठरला होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

काय म्हणाला मोईन अली?

आपल्या कारकिर्दीचा अभिमान व्यक्त करताना मोईन अली म्हणाला की, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इंग्लंडकडून खेळायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला किती सामने खेळायला मिळतील हे माहीत नसते. जवळपास ३०० सामने खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी नेहमीच कसोटी क्रिकेटला सर्वात महत्त्वाचे मानले आहे, पण एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळण्यातही मजा आली. निवृत्तीच्या निर्णयाबाबत मोईन म्हणाला की तो अजूनही खेळू शकतो हे त्याला माहीत आहे, पण संघाला पुढे जाण्यासाठी नवीन चेहऱ्यांची गरज आहे. त्याच्यासाठी हीच योग्य वेळ होती. तो म्हणाला की मला विश्वास आहे की त्याने संघासाठी आपली योग्य भूमिका बजावली आहे. आपल्या संघाचे आणि चाहत्यांचे मनोरंजन केले, याचा त्याला आनंद आहे.

हेही वाचा – Paralympics 2024 : मोबाईल बाळगणे पडले महागात! इटालियन खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये गमवावे लागले कांस्यपदक

मोईन अली विराट कोहलीसाठी ठरला डोकेदुखी –

आकडेवारीनुसार मोईन अलीने जगभरातील फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचवले. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीसाठी मोईन अली डोकेदुखी ठरला. मोईन अलीने विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप त्रास दिला. मोईन अलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये १० वेळा विराट कोहलीला आपला बळी बनवले. ज्यामध्ये त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक १० वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय मोईन अली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moeen ali star allrounder who led england to win the t20 and odi world cup has retired from international cricket vbm