फोटो आणि स्वाक्षरीसाठी गोंधळ घालणाऱया काही अतिउत्साही चाहत्यांवर सोमवारी प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर भडकले. तुम्ही इथे मॅच बघायला आला आहात की गोंधळ घालायला? असा प्रश्न त्यांनी चाहत्यांना विचारला. तुमच्या गोंधळाचा आवाज आत खोलीपर्यंत येतोय आणि त्याचा त्रास होतोय, असे त्यांनी चाहत्यांना ऐकवले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यासाठी गावसकरसह, संजय मांजरेकर आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन सोमवारी समालोचन करीत होते. मात्र, मैदानावरील पॅव्हेलियनच्या तिसऱया मजल्यावरील त्यांच्या खोलीबाहेर काही चाहते या तिघांसोबत फोटो काढण्यासाठी आणि त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी उतावीळ झाले होते. सुरुवातीला या अतिउत्साही चाहत्यांनी खोलीबाहेर आलेल्या हेडनसोबत स्वतःचे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी मांजरेकर यांनाही आपल्यासोबत फोटो काढण्यास आणि त्यांना स्वाक्षरी देण्यास भाग पाडले. खोलीबाहेर सुरू असलेल्या गोंधळामुळे गावसकर अस्वस्थ झाले आणि त्यांनी बाहेर येऊन गोंधळ घालणाऱया चाहत्यांना फटकारले. मैदानात जाऊन मॅच बघा आणि इथे गोंधळ करू नका, असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला. त्यानंतर तिथे बसलेल्या पोलिसांनी चाहत्यांना तिथून हटकण्यास सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohali test sunil gavaskar loses temper