फिक्सिंग प्रकरणामुळे दोषी आढळल्यानंतर बंदी घातलेला पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद आमिर पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात परतला आहे. १८ एप्रिलपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान या मालिकेचे आयोजन करत आहे. त्याचवेळी पीसीबीने या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेले वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि डावखुरा फिरकीपटू अष्टपैलू इमाद वसीम यांचे पाकिस्तान संघात पुनरागमन झाले आहे.
दहा दिवसांच्या या मालिकेतील तीन सामने रावळपिंडीत तर दोन सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपात दोषी आढळल्यानंतर इंग्लंडमध्ये तुरुंगवासाची शिक्षा भोगणारा आमिर २०२० मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.
तत्कालीन प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि वकार युनूस यांच्याशी मतभेद झाल्याने त्याने हे पाऊल उचलले होते. फिरकीपटू अष्टपैलू खेळाडू इमादने नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला होता. मात्र बोर्ड आणि निवड समिती यांनी समजूत घातल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आणि त्याचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
मोहम्मद युसूफ, अब्दुल रज्जाक, असद शफीक, वहाब रियाझ आणि बिलाल अफजल यांचा समावेश असलेल्या निवड समितीने उस्मान खान, इरफान खान नियाझी आणि फिरकी गोलंदाज अबरार अहमद या युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात मुहम्मद इरफान खान आणि उस्मान खान हे दोन अनकॅप्ड फलंदाज आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.