Mohammad Azharuddin gets ED summons: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अडचणीत सापडले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अझरूद्दीन यांना समन्स पाठवले आहेत. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये २० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचे म्हटले जात आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस पक्षाचे नेते असलेले अझरूद्दीन यांनी पहिल्यांदाच समन्स बजावण्यात आले आहेत. अझरुद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना आज तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागणार आहे. हे प्रकरण हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि छत खरेदीसाठी वाटप करण्यात आलेल्या २० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

अझरुद्दीन यांची सप्टेंबर २०१९ मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून २०२१ मध्ये त्यांना आपले पद सोडावे लागले होते. निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

ईडीच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक गैरवापर केला होता. त्यांनी खासगी कंपन्यांना वाढत्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा – PM Modi Letter to Neeraj Chopra Mother: “पण आज मी भावुक झालो…”, नीरज चोप्राच्या आईला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, नीरजच्या आईचे का मानले आभार?

क्रिकेटनंतर राजकारणी झालेले अझरुद्दीन २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर मुरादाबाद, यूपी येथून खासदार झाले होते. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राजस्थानमधून लढवली होती, मात्र या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१८ मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मोहम्मद अझरुद्दीन हे भारताचे माजी कर्णधार होते. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना होते. मॅच फिक्सिंगमध्ये त्याचे नाव आल्यानंतर २००० साली त्यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. त्यांनी भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.