Mohammad Hafeez On Pahalgam Terror Attack: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने भारतातील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यानंतर जगातील अनेक बड्या नेत्यांकडून भारताला पाठिंबा मिळत आहे. त्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधत व्यक्त केला. याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. तर काही माजी खेळाडूंनी भारताने पाकिस्तानबरोबरचे क्रिकेटमधील सर्व संबंध तोडावे अशी मागणी केली आहे.
हाफिजची दोन शब्दांची पोस्ट
पुलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद हाफिजने तो या घटनेमुळे दु:खी असल्याचे म्हटले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर, “दु:खी आणि हृदयद्रावक” असे दोन शब्द लिहित दु:ख व्यक्त केले. या पोस्टबरोबर त्याने पहलगाम दहशतवादी हल्ला असे इंग्रजी हॅशटॅगही वापरले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांबाबत शोक व्यक्त करणारा हाफिज हा आतापर्यंतचा एकमेव पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.
भारतीय क्रिकेटपटूंकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध
भारतीय क्रिकेट क्षेत्रातून विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री अशा मोठ्या खेळाडूंनी पहलगाममधील घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
दुसरीकडे आयपीएलमध्ये बंगळुरू, राजस्थान, कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रीवत्स गोस्वामीने जम्मू आणि काश्मीरच्या पलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सर्व प्रकारचे क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी केली आहे. यावेळी गोस्वामीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचेही समर्थन केले आहे.
मोहम्मद सिराजची संतप्त प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गृहमंत्री अमित शाह मृतांना श्रद्धांजली वाहताना दिसत असल्याचा फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने लिहिले की, “पहलगाममधील भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबाबत वाचले. धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे आणि त्यांची हत्या करणे हे अत्यंत वाईट आहे. कोणतेही कारण, कोणताही विश्वास, कोणतीही विचारसरणी अशा राक्षसी कृत्याचे कधीही समर्थन करू शकत नाही. हा कसला वाद आहे? जिथे माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही.”