Mohammad Kaif’s reaction to India-Pakistan match: मागच्या वेळी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये जेव्हा पाकिस्तानचा भारताशी सामना झाला, तेव्हा विराट कोहलीने लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वांची मने जिंकली. या सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक सामना जिंकला. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने भारताला अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढत पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून दिला. हा विजय भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात नेहमीच ताजा राहील. या खेळीबाबत आता मोहम्मद कैफने प्रतिक्रिया दिली आहे,
अशा परिस्थितीत २ सप्टेंबरला आशिया कप २०२३ मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारत आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा कोहलीकडून ‘विराट’ इनिंगची अपेक्षा असेल. ‘किंग कोहली’ हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे पाकिस्तानी संघालाही माहीत आहे. हे लक्षात घेऊन भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानला चांगलेच टेन्शन दिले आहे. कोहलीच्या या खेळीची आठवण करून देत तो म्हणाला की, विराटला गोलंदाजी करताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नक्कीच दडपणाखाली असतील.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तानविरुद्ध कोहलीची कामगिरी उत्कृष्ट होती. पाकिस्तानविरुद्ध खेळताना तो एक मजबूत फलंदाज म्हणून नेहमी पुढे आला आहे. तो पूर्ण जबाबदारी घेतो आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यात पटाईत आहे.”
त्या विश्वचषकात त्याचा जो फॉर्म होता. तो आशिया कप २०२२ मधील त्याच्या कामगिरीमुळे होता, ज्याची सुरुवात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतकाने केली होती.प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कोहलीची ५३ चेंडूत ८२* धावांची सामना जिंकणारी खेळी ही त्याच्या सर्वात कठीण खेळींपैकी एक होती. तो स्वतः ही टी-२० मधील आपली सर्वोत्तम खेळी मानतो.
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “आणि वस्तुस्थिती अशी आहे की त्याने टी-२० विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनाविरुद्ध खेळला. प्रत्येक पाकिस्तानी गोलंदाज कसा गोलंदाजी करतो, हे त्याला माहीत असेल, मग तो नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी किंवा हरिस रौफ असो.” विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध खूप धोकादायक ठरेल, असेही तो म्हणाला.
आशिया चषक यावेळी ५० षटकांच्या स्वरूपात खेळला जात आहे. त्यामुळे भारतीय संघ २०२३ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून आपला संघ ठरवू इच्छितो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत त्यांचे संघ संयोजन ठरवण्याचा प्रयत्न करेल.