भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ सध्या त्याच्या मूळ गावी प्रयागराजमध्ये आहे. याबाबत त्याने आपल्या वडिलोपार्जित घराचे आणि रस्त्यांचे फोटो आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहेत. पण त्यांच्या पोस्टमध्ये एक चूक झाली आहे. त्याने प्रयागराजला जुन्या नावाने म्हणजेच अलाहाबाद असे संबोधले. त्यानंतर लोकांनी कैफला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
याशिवाय लोकांनी कैफच्या पोस्टचा संबंध आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी लावला. काहींनी कमेंट करत लिहिले, ”मला वाटले तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.” बहुतेक लोकांनी कैफला या पोस्टवर अलाहाबाद ऐवजी प्रयागराज लिहिण्याची दुरुस्ती सुचवली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक मोहम्मद कैफने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, ”तेच रस्ते, तेच लोक, तेच प्रेम. कैदगंज, अलाहाबाद येथील माझ्या वडिलोपार्जित घराच्या काही आठवणी. या परिसराने मला क्रिकेट, जीवन आणि नातेसंबंधांचा अर्थ शिकवला आहे.”
हेही वाचा – अचानक छातीत दुखू लागलं आणि…; पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूला केलं रुग्णालयात दाखल!
विशेष म्हणजे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोहम्मद कैफने फुलपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पंडित जवाहरलाल नेहरूही या जागेवरून अनेकदा खासदार झाले होते. राहुल गांधींनी खूप समजावून सांगितल्यानंतर कैफने या जागेवरून निवडणूक लढवण्यास होकार दिला. मात्र मोदी लाटेतच त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी राजकारणाकडेही पाठ फिरवली.