बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला टी२० विश्वचषकापूर्वी बूस्टर डोस मिळाला आहे. त्याने यजमान न्यूझीलंडचा ५ गडी राखून टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पराभव केला. मात्र, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनाही या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद नवाजने पुन्हा एकदा सुरेख खेळी करत ३८ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.३ षटकात ५ गडी राखून लक्ष्य गाठले. टी२० विश्वचषक २०२२चे सामने १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार बाबर आझम १४ चेंडूत १५ धावा करून फिरकीपटू मिचेल ब्रेसवेलचा बळी ठरला. शान मसूदनेही २१ चेंडूत १९ धावा केल्या. दरम्यान, शानदार फॉर्मात असलेला यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने २९ चेंडूत ३४ धावा केल्या त्याला लेगस्पिनर ईश सोधीने बाद केले. हे दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. यानंतर मोहम्मद नवाज आणि हैदर अली यांनी दमदार भागीदारी रचत संघाचा विजय निश्चित केला.
७४ धावांत ३ गडी बाद झाल्यानंतर मोहम्मद नवाज आणि हैदर अली यांनी २६ चेंडूत ५६ धावांची भागीदारी करत संघाला विजयी मार्गावर नेले. तर ३ चौकार आणि २ षटकार मारत हैदर अलीने १५ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट २०७ होता. दुसरीकडे, अष्टपैलू नवाजने २२ चेंडूत ३८ धावा करत तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. १७३ च्या स्ट्राइक रेटने २ चौकार आणि ३ षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. आसिफ अली एक धाव काढून बाद झाला. संघाला विजयासाठी शेवटच्या ३ षटकात २३ धावा करायच्या होत्या.
ट्रेंट बोल्टने १८व्या षटकात १२ धावा दिल्या. याच षटकाने पाकिस्तान सामन्यात आला आणि आता केवळ १२ चेंडूत ११ धावा हव्या होत्या. टीम साऊदीने १९व्या षटकात ७ धावा दिल्या. शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी ४ धावा करायच्या होत्या. टिकनरच्या पहिल्या ३ चेंडूंवर पाकिस्तानने आवश्यक धावा केल्या. इफ्तिखार अहमद १४ चेंडूत २५ धावा करून तो नाबाद राहिला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारत नवाजसोबत २० चेंडूत ३६ धावांची नाबाद भागीदारी केली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने ४ चौकार आणि २ षटकार मारत ३८ चेंडूत ५९ धावा केल्या. याशिवाय ग्लेन फिलिप्सने २९ आणि मार्क चॅपमनने २५ धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी २-२ बळी घेतले.