Pakistan New White Ball Captain Announced by PCB Chief: पाकिस्तान क्रिकेट संघाला पुन्हा एकदा नवा कर्णधार मिळाला आहे. अलीकडेच बाबर आझमने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तो एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची कमान सांभाळत होता. बाबर आझमने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची ही दुसरी वेळ होती. अशा स्थितीत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी नवीन कर्णधाराची निवड केली आहे. हा दौरा ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी-20 सामने खेळवले जातील.
पाकिस्तानच्या नवीन पांढऱ्या चेंडू संघाच्या कर्णधाराची घोषणा पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये एका पत्रकार परिषदेत केली. मोहसीन नक्वी यांनी जाहीर केले की मोहम्मद रिझवान आता पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडू संघाचा कर्णधार असेल. त्याचबरोबर सलमान आगाला पांढऱ्या चेंडूच्या संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतून संघाची कमान सांभाळणार आहे. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यावर तो टी-२० संघाचा भाग असणार नाही, त्यादरम्यान सलमान आगा संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसेल.
हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
मोहम्मद रिझवानला पहिल्यांदाच पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद देण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये आपल्या संघाचे फक्त नेतृत्त्व केले नाही तर विजेतेपदही पटकावले आहे. याआधी रिझवानने कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने २०२०-२१ च्या न्यूझीलंड दौऱ्यावर २ कसोटी सामने खेळले. मात्र या दोन्ही सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
आगामी काळात रिझवानसमोर अनेक मोठी आव्हानं असणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून तो कसा कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कर्णधार म्हणून रिझवानने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली त्याचा PSL संघ २०२१ साली चॅम्पियन बनला. त्यांचा संघ २०२२ आणि २०२३ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता.