एका बाजूला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामना सुरु असताना तिकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध सामना झाला. ऑस्ट्रेलिया प्रमाणेच तिकडेही इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी ८५ धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान, पाकिस्तानचा यष्टीरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवानने एक मैलाचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा पार करताना त्याने भारतीचा रन मशिन विराट कोहलीला मागे टाकले. याआधी त्याचा साथीदार कर्णधार बाबर आझमने देखील विराटला मागे टाकले होते.

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या टी२० मधील २००० धावा पूर्ण केल्या. रिझवानने फक्त टी२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमच केला नाही, तर टी२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २००० धावा करणाऱ्यांच्या यादीत आता तो बाबर आझमसोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने ५२ डावात ही कामगिरी केली. बाबर आझमने देखील ५२ डावात २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

याच यादीत भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५६ टी२० डावात २००० धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचाच केएल राहुल आहे. त्याने ५८ डावात टी२० मध्ये २००० धावांचा टप्पा पार केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने २००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ६२ डाव घेतले होते.

हेही वाचा   :  कालच्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीवर चाहते प्रचंड नाराज म्हणाले, ‘नक्की कोणता सूर गवसला’ 

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना कालच्या सामन्यात ७ बाद १५८ धावा केल्या. रिझवान व बाबर आजम यांनी पहिल्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. पण, १०व्या षटकात बाबर (३१) बाद झाला अन् पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ११.३ षटकांत पाकिस्तानने ७ फलंदाज ७५ धावांवर गमावल्याने इंग्लंडसमोर माफक लक्ष्य उभे राहिले. रिझवानने ४६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६८ धावा केल्या. इफ्तिकार अहमद २८ धावांवर बाद झाला. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. वूडने २४ धावांत ३, तर राशिदने २७ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फिल सॉल्ट (१०), डेविड मलान (२०) व बेन डकेट (२१) हे माघारी परतल्यानंतर सलामीवर ॲलेक्स हेल्स व हॅरी ब्रूक यांनी दमदार खेळ केला. हेल्सने ४० चेंडूंत ७ चौकारांसह ५३ धावा केल्या. ब्रूकने २५ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. इंग्लंडने १९.२ षटकांत ४ बाद १६० धावा करून विजय मिळवला.