Mohammad Rizwan viral video in PAK vs BAN 1st test match : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने १७१ धावांची नाबाद खेळी केली. रिझवान द्विशतक करेल असे वाटत होते, पण त्याआधीच पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने डाव घोषित केला. ज्यामुळे मोहम्मद रिझवानला १७१ धावांवर नाबाद परतावे लागले. यानंतर त्याने सीमारेषेजवळ आल्यानंतर बॅट फेकली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच पाकिस्तानने आपला डाव ६ गड्यांच्या मोबदल्यात ४४८ धावांवर घोषित केला. त्यावेळी रिजवान १७१ तर शाहीन आफ्रिदी २९ धावांवर खेळत होता. यानंतर मोहम्मद रिझवान मैदानातून परतत असताना बाबर आझम त्याच्या स्वागतासाठी सीमारेषेजवळ आला होता. त्यावेळी मोहम्मद रिझवानने लगेच त्याच्या दिशेने बॅट फेकली.
मोहम्मद रिझवानने बॅट फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल –
शकील आणि रिझवानच्या फलंदाजीच्या जोरावरच पाकिस्तानने या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केले, अन्यथा एकेकाळी बांगलादेशने आपली पकड बरीच घट्ट केली होती. पाकिस्तानला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर त्यांना बांगलादेशविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. रावळपिंडीतील सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे बराच वेळ वाया गेला. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बाबर आझम पहिल्या डावात दोन चेंडू खेळून खाते न उघडता बाद झाला.
शान मसूदच्या या निर्णयावर चौफेर टीका –
शान मसूदच्या या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. चाहत्यांनी तर सोशल मीडियावर म्हटले की, मसूदने मुद्दाम रिझवानच्या द्विशतकाची वाट पाहिली नाही. तर काहींनी मसूदला स्वार्थी म्हटले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेससाठी आलेल्या संघाचा उपकर्णधार सौद शकीलने शान मसूदने डाव घोषित करण्याच्या निर्णयाचे कारण सांगितले.
मोहम्मद रिझवान १७१ धावांवर असताना डाव का घोषित केला?
पाकिस्तानचा उपकर्णधार शकीलने सांगितले की, “संघ कधी डाव घोषित करणार आहे, हे रिझवानला आधीच माहित होते. जोपर्यंत रिझवान भाईच्या द्विशतकाचा प्रश्न आहे, मी हे स्पष्ट करतो की डाव घोषित करण्याचा निर्णय घाईघाईने घेतला गेला नाही. संघ नेमका कधी डाव घोषित करणार हे रिझवानला दीड तास आधीच माहीत होते. आम्ही डाव घोषित करण्यापूर्वी ४५० धावांच्या आसपास आकडा गाठण्याच्या प्रयत्नात होतो.”
© IE Online Media Services (P) Ltd