पत्नी हसीन जहाँच्या आरोपांचा सामना करत असलेल्या भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने अजून एक मोठा खुलासा केला आहे. आपण अलिश्बा नावाच्या एका पाकिस्तानी तरुणीला दुबईत भेटलो होतो अशी कबुली मोहम्मद शमीने दिली आहे. मोहम्मद शमीने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘मी दुबईत अलिश्बाला भेटलो होतो. ती माझी इन्स्टाग्राम फॉलोअर आहे आणि त्याच नात्याने तिच्याशी बोलणं झालं होतं’. शमीने सांगितल्याप्रमाणे, ‘अलिश्बा दुबईत आपल्या बहिणीच्या घरी आली होती. आपण तिला फक्त एक मैत्रीण, एक चाहती म्हणून भेटलो होतो’. यामध्ये आक्षेपार्ह किंवा चुकीची अशी कोणतीच गोष्ट नाही. पण मीडिया चुकीच्या पद्दतीने हे सर्व दाखवत आहे असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.
यावेळी शमीला पैशांची काही देवाण-घेवाण झाली का ? विचारलं असता त्याने पैशांसंबंधी कोणतंच बोलणं झालं नसल्याचं सांगितलं आहे. ‘मॅच फिक्सिंगचे आरोप अत्यंत बेजबाबदार आहेत आणि आपण त्याबद्दल विचारही करु शकत नाही’, असं शमीने सांगितलं आहे. यावेळी शमीला वारंवार नाव समोर येणा-या मोहम्मद भाईसंबंधीही विचारण्यात आलं. यावर बोलताना शमीने सांगितलं की, ‘मोहम्मद भाईचं नाव कोणापासूनही लपून राहिलेलं नाही आणि त्याला सर्वजण ओळखतात. त्याला संघातील सर्व खेळाडू भेटतात’.
मोहम्मद भाईच्या माध्यमातून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करणारी हसीन जहाँही त्याला भेटली आहे अशी माहिती शमीने दिली आहे. ‘हसीन जहाँ मोहम्मद भाईला भेटली आहे, त्याच्यासोबच डिनरही केला आहे असं शमीने सांगितलं. एकदा एका मुलाखतीत हसीन जहाँने तो चांगला व्यक्ती असून, दिवसातील पाचवेळा नमाज पडणारा व्यक्ती आहे असं म्हटलं होतं. पण मग अचानक तिचा विश्वास कसा काय उडाला ? मोहम्मद भाईवर तिने केलेले मॅच फिक्सिंगचे आरोप माझ्या समजण्यापलीकडचे आहेत’, असं शमीने म्हटलं आहे.
बीसीसीआयने मॅच फिक्सिंग प्रकरणी आपली चौकशी केली असल्याचंही शमीने मान्य केलं आहे. जर माझ्या मनात चोर नाही तर मग मी चौकशीला का घाबरु ? जर मॅच फिक्सिंग प्रकरणात मी दोषी आढळलो, तर मिळेल त्या शिक्षेसाठी मी तयार आहे असं शमीने म्हटलं आहे.