Mohammad Shami Slams Pakistan: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. केवळ ७ सामन्यांमध्ये शमीने २४ विकेट्स घेत पराक्रम केला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात शमीच्या विक्रिमी सात विकेट्समुळे भारत अंतिम सामन्यात पोहचू शकला. संपूर्ण भारताने शमीचे यश साजरे केले असताना, पाकिस्तानकडून मात्र वेळोवेळी शमीवर काही आरोप झाले. माजी खेळाडू हसन रझाने भारतीय संघावर ‘फसवणूक’ केल्याचा आरोप करताना शमी आणि भारतीय गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत वेगवेगळे चेंडू दिले गेल्याचे म्हटले होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्यानंतर आता मोहम्मद शमीने एका मुलाखतीत या आरोपांना सणसणीत उत्तर दिले आहे.
तुम्हालाही माहित असेल की, मोहम्मद शमी पहिल्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. खरं तर, हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर संघात स्थान मिळण्यापूर्वी तो पहिल्या ४ विश्वचषक सामन्यांना मुकला होता. शमीने खेळलेल्या पुढील ७ सामन्यांमध्ये दोन वेळा पाच विकेट्स घेऊन भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले होते. यानंतर पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटुंच्या कमेंट्स चर्चेत आल्या होत्या यावर उत्तर देताना शमी म्हणाला की, शेजारच्या देशातील काही लोक त्याचे यश पचवू शकले नाहीत.
शमी पुढे म्हणाला की, “मी देवाला प्रार्थना करतो की १० गोलंदाज माझ्यासारखीच किंवा अजून छान कामगिरी करून पुढे येऊदे . मला कोणाचाही द्वेष, मत्सर वाटत नाही. जेव्हा तुम्ही इतरांच्या यशाचा आनंद घेण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही एक चांगला खेळाडू ठरता. गेल्या काही दिवसांपासून मी खूप ऐकत होतो. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मी प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हतो. जेव्हा मला संघात समाविष्ट केले गेले तेव्हा मी ५ विकेट घेतल्या. पाकिस्तानचे काही खेळाडू माझे यश पचवू शकले नाहीत. खरं तर, त्यांना वाटते की ते सर्वोत्कृष्ट आहेत. माझ्या मते, वेळेवर कामगिरी करणारा खेळाडू सर्वोत्तम असतो.”
Video: मोहम्मद शमीचं पाकिस्तानला सणसणीत उत्तर..
हे ही वाचा<< रोहित शर्मा, विराट कोहलीने मागितली माफी; Video पाहून चाहते हळहळले, पण ‘ही’ बाब माहितेय का?
शमी सांगतो की, ” जर एखाद्या समज नसलेल्या व्यक्तीने अशी टिपण्णी केली असती तर ठीक आहे पण हसन रझा सारखा माजी खेळाडू, ज्याने स्वतः हे सगळं अनुभवलंय त्याने अशी टीका करणे हे आश्चर्यकारक आहे. ते लोक विनाकारण वाद सुरु करतात. स्वतः वसीम अक्रम (भाई) ने एका शो मध्ये चेंडू कसा निवडला जातो याविषयी सांगितलं होतं तरीही त्यांना समजू नये, हे स्वतः माजी खेळाडू आहेत त्यांनी अशी विधाने करायला नकोत.”