यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जेवढी चर्चा टीम इंडियाच्या चौफेर उधळलेल्या विजयरथाची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या तुफान फॉर्मचीही आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमी सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये खेळला नव्हता. मात्र, तरीही तो स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादी दिमाखात दाखल झाला आहे. त्यामुळे शमीवर अवघ्या भारतातील क्रिकेट चाहते स्तुतिसुमनं उधळत असताना त्याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहान मात्र त्याला शुभेच्छा द्यायला तयार नाही. यासंदर्भात एका ऑनलाईन मुलाखतीमध्ये हसीन जहाननं ही प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली हसीन जहान?

या मुलाखतीमध्ये हसीन जहानला यंदाच्या वर्ल्डकपमधील मोहम्मद शमीच्या कामगिरीविषयी सांगताना त्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर हसीन म्हणाली, “मी क्रिकेट बघतच नाही. त्यामुळे मी क्रिकेटची फॅन नाही. कुणी किती विकेट घेतल्या हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. पण काहीही असलं, तरी तो चांगला खेळत असेल तर संघात त्याचं स्थान कायम राहील. चांगले पैसे कमावेल. त्यामुळे आमचं भविष्य सुरक्षित होईल. याहून चांगली बाब काय आहे?”

दरम्यान, तू वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियाला, मोहम्मद शमीला शुभेच्छा देशील का? अशी विचारणा केली असता हसीननं “मी टीम इंडियाला शुभेच्छा देईन, पण त्याला शुभेच्छा देणार नाही”, असं ती म्हणाली.

विश्लेषण: कौटुंबिक कलह, नैराश्य, तंदुरुस्ती… मोहम्मद शमीने विविध आव्हानांवर कशी केली मात? विश्वचषकातील कामगिरी किती खास?

मोहम्मद शमी व हसीन जहान यांचा वाद

काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोहम्मद शमी व हसीन जहान यांच्यात घटस्फोटाचा न्यायालयीन लढा झाला. अखेर न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला. यादरम्यान हसीन जहाननं त्यांच्या मुलाचा ताबा स्वत:कडे घेतला. हसीन जहानने शमीवर कौटुंबिक हिंसाचार, वैवाहिक बलात्कार (Marital Rape), मॅच फिक्सिंग असे अनेक गंभीर आरोप केले. हे सगळे आरोप शमीनं फेटाळले आहेत. “मी माझ्या देशासाठी मरण पत्करेन पण फसवणूक करणार नाही”, असं शमीनं ठामपणे सांगितलं.

जहानच्या तक्रारीनंतर मोहम्मद शमीविरोधात निघालेलं अटक वॉरंट कोलकाता उच्च न्यायालयाने स्थगित केलं होतं. त्याविरोधात हसीन जहाननं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad shami ex wife hasin jahan says wont wish him for world cup 2023 success pmw