India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमी भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांना मागे टाकून त्याने हा ऐतिहासिक विक्रम केला. शमीने स्पर्धेतील १४व्या डावात ४५ विकेट घेतल्या. अनुभवी जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताकडून ४४-४४ विकेट घेतल्या होत्या.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आधुनिक दिग्गज मोहम्मद शमीने अनोखी कामगिरी केली. शमीने श्रीलंकेविरुद्ध ५ षटकात केवळ १८ धावा देत ५ विकेट घेतल्या. या काळात त्याने एक मेडन षटकही टाकले. या शानदार कामगिरीच्या जोरावर मोहम्मद शमीने सामनावीराच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

वर्ल्डकपमध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज –

मोहम्मद शमी – ४५ विकेट्स (मॅच – १४)
झहीर खान – ४४ विकेट्स (मॅच -२३)
जवागल श्रीनाथ – ४४ विकेट्स (मॅच – ३४)
जसप्रीत बुमराह – ३३ विकेट्स (मॅच – १७)

आयसीसी विश्वचषक २०२३ चा तिसरा सामना खेळत असलेला शमी खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने ३ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध ४ इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनवले. आता श्रीलंकेविरुद्ध त्याने पुन्हा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – युनिसेफ राजदूत सचिन तेंडुलकरचे मुलींच्या हक्कांसाठी आवाहन, वानखेडे स्टेडियम निळ्या रंगात रंगले

वनडेमध्ये सर्वात जास्त वेळा ५ बळी घेणारे भारतीय गोलंदाज –

मोहम्मद शमी – ४ वेळा
हरभजन सिंह – ३ वेळा
जवागल श्रीनाथ – ३ वेळा

हेही वाचा – IND vs SL, World Cup 2023: वानखेडेवर लंकेचं पानिपत करत टीम इंडिया उपांत्य फेरीत; भारतीय संघाचा ३०२ धावांनी अद्भुत विजय

मोहम्मद शमीची एकूण विश्वचषकातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा त्याने एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. ज्यासह त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कची बरोबरी केली. शमीसाठी, त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे चौथी वेळ आहे, जेव्हा त्याने पाच विकेट्स घेतल्या. तसेच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक ४ वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. त्याने माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले आहे, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी ३ वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या.