Wasim Akram Mohammad Shami: २०२३ विश्वचषकासाठी भारताच्या पहिल्या पसंतीच्या प्लेइंग इलेव्हनचा भागही नसलेल्या मोहम्मद शमीने विरोधी संघांची दाणादाण उडवली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या पाठोपाठ शमी हा भारतातील तिसरा वेगवान गोलंदाज आहे. मात्र भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत समतोल साधण्यासाठी हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर या दोन फिरकीपटूंना प्राधान्य दिले होते. मात्र , हार्दिक पांड्याला झालेल्या दुर्दैवी दुखापतीमुळे शमीला महत्त्वाची संधी गवसली आणि त्याने त्याचं सोनं करून भारताच्या विक्रमी विजयीरथाला बळ दिले. शमीने तीन सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. तर रविवारी कोलकात्याला रंगलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात शमीने चार षटकांत केवळ १८ धावा देत दोन बळी घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद शमीला वसीम अक्रमची साथ मिळाली तेव्हा..

मोहम्मद शमी हा २००६ मध्ये मोहन बागानमध्ये जाण्यापूर्वी डलहौसी अॅथलेटिक क्लब आणि नंतर टाऊन क्लबकडून खेळला होता. हिंदुस्थान टाइम्सच्या माहितीनुसार, मोहन बागानचे प्रशिक्षक असलेल्या मोनायम यांनी अलीकडेच मोहम्मद शमीच्या खेळाचे श्रेय पाकिस्तानी माजी कर्णधार वसीम अक्रम याला दिले होते. मोनायम म्हणतात की, “आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्ससह २०१३ चा हंगाम शमीसाठी गेमचेंजर ठरला होता कारण भारताच्या स्टारला पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमसह खेळण्याची संधी मिळाली होती.”

“वसीम अक्रमने शमीवर खूप काम केले होते. शमीची मनगटाची लवचिकता आधीच खूप चांगली होती पण वसीम भाईने बॉल हातातून सोडण्याचं कसब त्याला शिकवलं. केकेआरसाठी त्याला जास्त वेळ मिळत नव्हता, पण तो नेहमी वसीमच्या बरोबर असायचा. वसीम अक्रमनेच त्याला गोलंदाज बनवले आणि अर्थातच त्याने खूप मेहनत घेतली आहे.”

हे ही वाचा<< “विश्वचषकात मानवी हक्क की 2 पॉईंट्स, कोणती बाजू..”, नवीन उल हक ‘या’ संघावर भडकला; म्हणाला, “यांचे स्टॅंडर्ड..”

वसीम अक्रमकडून मोहम्मद शमीचं कौतुक..

दरम्यान, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीबद्दल बोलताना अक्रमने सुद्धा पाकिस्तानी चॅनल ‘ए’ स्पोर्ट्सवर म्हटले होते की, “जेव्हा मी अशा आऊटस्विंगर्सना उजव्या हाताच्या फलंदाजांना नवीन चेंडू टाकायचो, तेव्हा कधी-कधी मला चेंडूवर ताबा ठेवता येत नसे, पण शमी नवीन चेंडूवर लगेच नियंत्रण मिळवतो. तो माझ्यापेक्षा चांगला गोलंदाज आहे. नवीन चेंडूने तो कोणत्या लेंथवर गोलंदाजी करतो, याविषयी तो फलंदाजांच्या मनात नेहमीच शंका निर्माण करतो. मी त्यांच्या (बुमराह आणि शमी) तुलनेत कुठेच नाही. माझ्यापेक्षा ते दोघं चांगली गोलंदाजी करत आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad shami is baller made by pak ex captain wasim akram says shami ex coach special event after world cup 2023 wickets svs