मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्या वादात एक नाव वारंवार समोर येत होतं ते म्हणजे मोहम्मद भाई. मोहम्मद भाईने शमीला पाकिस्तानी तरुणी अलिश्बाच्या माध्यमातून पैसे दिल्याचा आरोप हसीन जहाँने केला होता. दरम्यान मोहम्मद भाईने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शमीवरील मॅच फिक्सिंगचे आरोप चुकीचे असून पूर्णत: निर्दोष आहे असा दावा केला आहे. यावेळी त्याने आपण अलिश्बा नावाच्या कोणत्याही तरुणीला ओळखत नसल्याचंही सांगितलं आहे.
‘मी एक क्रिकेटचा चाहता म्हणून मोहम्मद शमीला ओळखतो. इंग्लंडमध्ये एका क्रिकेट सामन्यादरम्यान आमची भेट झाली होती. तेव्हा हसीन जहाँदेखील आली होती. हसीन मला भाऊ म्हणायची, मी त्यांचा प्रचंड आदर करायचो. त्यांना काही गरज लागली की मदत करायचो’, असं मोहम्मद भाईने सांगितलं आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही, कोणतीही मॅच फिक्सिंग केलेली नाही असंही त्याने सांगितलं.
‘जगातील कोणत्याही तपास यंत्रणेला कोणतीही टेस्ट करायची असेल तर मी तयार आहे. मी पुर्ण सहकार्य करेन. जर त्यांना इंग्लंडला यायचं असेल तर मी स्वत: त्यांना विमानतळावर घ्यायला जाईल’, असं मोहम्मद भाईने म्हटलं आहे.
यावेळी पाकिस्तानी तरुणी अलिश्बाबद्दल बोलताना त्याने सांगितलं की, ‘अलिश्बाचं नाव मी पहिल्यांदा मीडियामधून ऐकलं. भारतात कधीचं मुस्लिम महिलेचं नाव अलिश्बा नसतं. मी तिला ओळखत नाही, कधी भेटलेलो नाही…कधी पाकिस्तानलाही गेलेलो नाही. माझं नाव कसं काय जोडण्यात आलं याचं आश्चर्य वाटतं’.
याआधी मोहम्मद शमीने आपण अलिश्बा नावाच्या एका पाकिस्तानी तरुणीला दुबईत भेटलो होतो अशी कबुली दिली होती. मोहम्मद शमीने सांगितलं होतं की, ‘मी दुबईत अलिश्बाला भेटलो होतो. ती माझी इन्स्टाग्राम फॉलोअर आहे आणि त्याच नात्याने तिच्याशी बोलणं झालं होतं’. शमीने सांगितल्याप्रमाणे, ‘अलिश्बा दुबईत आपल्या बहिणीच्या घरी आली होती. आपण तिला फक्त एक मैत्रीण, एक चाहती म्हणून भेटलो होतो’. यामध्ये आक्षेपार्ह किंवा चुकीची अशी कोणतीच गोष्ट नाही. पण मीडिया चुकीच्या पद्दतीने हे सर्व दाखवत आहे असं मोहम्मद शमीने म्हटलं होतं.