भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीने आयपीएलसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मोहम्मद शमीने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात प्रवेश केला असून, ट्रेनिंग सुरु केली आहे. पत्नी हसीन जहाँसोबत झालेला वाद आणि त्यानंतर झालेला अपघात यामुळे मोहम्मद शमीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या सर्व गोष्टींमुळे मोहम्मद शमीच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर संशय होता. मात्र शमीने या सर्वांवर मात करत पुनरागमन केलं आहे. शमीने फेसबुकवर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या जर्सीत सराव करतानाचा फोटो शेअर केला आहे. पुनरागमनामुळे मी अत्यंत आनंदी आहे, तुमच्या सर्वांचे आभार असं शमीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद शमीच्या पोस्टला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, आपलं समर्थन दिलं आहे. काही युजर्सनी तर पोस्टवरुन हसीन जहाँला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्सनी पत्नी हसीन जहाँला माफ करण्याचा सल्ला दिला आहे.

शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि दुस-या तरुणींसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. हसीन जहाँने शमीविरोधात मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. हसीन जहाँच्या आरोपानंतर बीसीसीआयने शमीला वार्षिक करारातून बाहेर केले होते. मात्र शमी निर्दोष सिद्ध झाल्यानंतर करारात सामील करुन घेण्यात आलं. या सर्व वादात अडकलेला असतानाच शमीचा देहरादूनहून दिल्लीला येताना अपघात झाला होता. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली होती. शमीच्या डोक्याला दुखापत झाली होती.

मोहम्मद शमीने या सर्व अडचणींवर मात करत सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ट्रेनिंग सेशनला हजेरी लावली. शमी अजून पुर्णपणे फिट झाला नाहीये, मात्र पहिल्या सामन्यापर्यंत तो पूर्ण फिट होईल असा विश्वास दिल्ली डेअरडेव्हिल्सने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad shami shares photo of practice with delhi daredevils