Nomination for the ICC Player of the Month Updates : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. शमीच्या या शानदार कामगिरीनंतर त्याला नोव्हेंबर महिन्याच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तथापि, शमीसाठी हा पुरस्कार जिंकणे सोपे होणार नाही. कारण त्याला एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावणाऱ्या कांगारू संघाच्या दोन खेळाडूंकडून कठीण आव्हान आहे. शमीसह ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
शमीची हेड आणि मॅक्सवेलशी टक्कर –
मोहम्मद शमीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी घेतले होते, परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत शमीने नोव्हेंबर महिन्यात एकूण १५ बळी घेतले होते आणि त्याची सरासरी १२.०६ होती, तर इकॉनॉमी रेट ५.६८ होता. तसेच, शमीने या स्पर्धेत केवळ ७ सामन्यात २४ बळी घेतले होते. नोव्हेंबर महिन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता, तर उपांत्य फेरीत त्याने किवी संघाविरुद्ध ५७ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रॅव्हिस हेडबद्दल बोलायचे, तर एकदिवसीय विश्वचषक त्याच्यासाठी खूप चांगला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्याने आपल्या संघासाठी ५ सामन्यात २२० धावा केल्या. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत त्याने आपल्या संघासाठी उत्कृष्ट इनिंग खेळली. त्याचबरोबर अंतिम सामन्यात भारताविरुद्धची त्याची खेळी संस्मरणीय ठरली, ज्यात त्याने १२० चेंडूत १३७ धावा केल्या. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपल्या संघासाठी ४८ चेंडूत ६२ धावांची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली होती.
हेही वाचा – ‘T20 World Cup 2024’चा लोगो आयसीसीने केला लाँच, वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार स्पर्धेचे आयोजन
ग्लेन मॅक्सवेलने गेल्या महिन्यात कांगारू संघासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये १५२.२३ च्या स्ट्राइक रेटने २०४ च्या सरासरीने २०४ धावा केल्या, त्यासोबत दोन विकेट्स घेतल्या. यानंतर, भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये, त्याने २०७.१४ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने ११६ धावा केल्या. नोव्हेंबरमध्येच विश्वचषकादरम्यान, मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध १२८ चेंडूत २०१ धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याने यादरम्यान २१ चौकार आणि १० षटकार मारले.