Mohammad Shami Trolled By Pakistani Tweets Over Religion: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध सात विकेट्स घेऊन जगभरातून कौतुक मिळवले. खरंतर भारत विजयी झाल्याने कौतुक होत असलं तरी यापूर्वी अनेकदा जेव्हा भारताने एखादा सामना गमावला आहे तेव्हा तेव्हा ट्रोलर्सने शमी व अन्य अनेक खेळाडूंना धर्मावरून टार्गेट केले आहे. पण हे ट्रोलिंग मुळात कोण करतं याविषयी गुप्तचर सूत्रांच्या हवाल्यांनी न्यूज १८ ने वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, भारतात हिंदू- मुस्लिम मुद्द्यावरून फूट पाडण्यासाठी भडकवणारे द्वेषयुक्त ट्वीट करणारे अकाउंट बनवण्यास पाकिस्तानच्या सायबर युनिटकडून प्रोत्साहन दिले जाते तर याची देखरेख करण्याचे काम इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) द्वारे केले जाते. पाकिस्तान-आधारित प्रोफाइल खेळांमध्ये जातीय फूट निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करत असतात असेही सांगण्यात आले आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात शमीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा झेल सोडल्याने लगेचच सोशल मीडियावर त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर त्याने विल्यमसनला बाद करून कर्णधार आणि डॅरिल मिशेल यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी मोडून काढल्यानंतर ट्रोलिंगला आळा बसला.
आजवरच्या निरीक्षणानुसार गुप्तचर सूत्रांनी असे सांगितले होते की हे ट्रोल्स सामान्यत: एखाद्या खेळाडूची कृती किंवा हावभाव निवडतात आणि सोशल मीडियावर द्वेषपूर्ण टिपण्णी करण्यास सुरूवात करतात. उदाहरणार्थ, २०२१ मध्ये, टी २० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर शमीला त्याच्या धर्मावरून सोशल मीडिया ट्रोलद्वारे लक्ष्य केले गेले.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात, भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतरही शमीच्या धर्माबद्दल पाकिस्तानातील ट्रोल्सने वेगळाच मुद्दा उचलून धरला होता. शमीने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या व त्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये शमी खाली बसून नमाज पठण किंवा सजदा करणार होता पण त्याला आपण कुठे आहोत हे आठवल्याने तो थांबला असे या व्हिडीओसह लिहिण्यात आले होते. भारतीय संघात असल्याने त्याला धर्माचे पालन करता येत नाही असेही काहींनी म्हटले होते.
हे ही वाचा<< IND vs NZ: ७ विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला संध्याकाळी पीचबाबत होती ‘ही’ भीती! स्वतः सांगितलं, “दुपारी खूप..”
भारतीय गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या क्रिकेट सामन्यांमधील पाकिस्तानची निराशाजनक खेळी पाहता आता धर्माचा वापर करून भारतीय क्रिकेटपटूंचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांनी निदर्शनास आणून दिले की काही भारतीय मुस्लिम गट देखील शमीला त्याच्या धर्मावरून लक्ष्य करताना दिसत आहेत.
दरम्यान, आज काँग्रेस नेते श्रीनिवास व्ही. बी यांनी सुद्धा २०२१ मधील शमीच्या ट्रोलिंगची आठवण करून देत त्यावेळेस केवळ राहुल गांधीच शमीच्या पाठीशी उभी होते अशी पोस्ट केली होती. दुसरीकडे कालच्या सामन्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी व असंख्य भारतीय चाहत्यांनी मोहम्मद शमीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.